सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला : माळ जमिनीतील शेतीच्या हंगामाला उपयुक्त
वार्ताहर /उचगाव
उचगाव परिसरात मंगळवारी दोनच्या सुमारास अवकाळी वळिवाचा जोरदार पण समाधानकारक पाऊस झाला. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा एकदा सुखावला आहे. गेल्या दोन आठवड्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने माळ जमिनीतील, शेतवडीतील शेतीच्या हंगामाला हा पाऊस वरदान ठरला आहे. या पावसामुळे शेतवडीमध्ये पाणी साचल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. तर आंबा, काजू बागायतमधील जोरदार वाऱ्याच्या आणि पावसाच्या तडाख्याने आंबे, काजू, मुरठे पडून बागायतदारांचेही मोठे नुकसान झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत होते. मागील पावसानेही असे झोडपून काढले होते. पण यावेळी झालेल्या पावसामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून उष्णतेचा कहर झाला होता. सर्वत्र उष्णतेचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले होते. या उन्हाळी हंगामामधील उष्णतेचा पारा अधिकच वाढला होता. गेल्या दोन-तीन दिवसात तर उष्णतेचा उच्चांक या भागात झाला होता. सगळीकडे लाहीलाही होत असतानाच दुपारी दोनच्या सुमाराला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे तसेच शेतवडीतील झाडांच्या अनेक फांद्या जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने कोसळल्याचेही चित्र दिसून येत होते. सुळगा-उचगाव या पट्ट्यातही रस्त्याच्या दुतर्फा असलेले झाड कोसळल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.
गावागावातून ग्रामपंचायतींनी गटारींची स्वच्छता न केल्याने असलेली गटारे याचबरोबर रस्त्यांच्या दुतर्फा साचलेल्या गाळ, माती, दगड यामुळे गटारीतील पाणी न वाहिल्याने सर्वत्र पाणी तुंबून अनेक ठिकाणी घरातूनही पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत होते. या भागात हा तिसऱ्यांदा वळिवाचा जोरदार पाऊस झाला. मात्र अद्याप ग्रामपंचायतींना जाग आली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक गावातील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे. शेतकरी वर्ग पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच या मुसळधार पावसाने सर्वत्र झोडपून काढल्याने शेतवडीत असलेल्या ऊस आणि इतर भाजीपाला या सर्व पिकांना या पावसाने जीवदान दिले आहे. वरूणराजाची कृपा झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. या भागात तिसऱ्यांदा जोरदार वळीव पाऊस झाल्याने जमिनीची मशागत करण्यासाठी आता शेतकरी वर्गाला सोपे झाले आहे. याचबरोबर शेतवडीत असलेल्या मिरची व इतर भाजीपाला पिकालाही हा पाऊस वरदान ठरल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.









