जानवे कापून अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी
बेळगाव : दावणगेरे, बिदर, धारवाडसह राज्यातील विविध ठिकाणी परीक्षेच्यावेळी ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या गळ्यातून जानवे काढायला लावली आहेत. यासंबंधी दि. 21 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा.ब्राह्मण समाजातर्फे निदर्शने करणार आहेत. रविवारी आरपीडी कॉलेजजवळील श्रीकृष्ण मठात झालेल्या समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. कन्नड साहित्य भवनपासून मिरवणुकीने जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देणार आहे. राणी कित्तूर चन्नम्मा चौकातही निदर्शने करण्यात येणार आहेत. यावेळी कृष्ण मठाचे श्रीनिवास होन्नीदिब्ब आचार्य, जिल्हा ब्राह्मण समाज ट्रस्ट अध्यक्ष राम भंडारे, अॅड. एस. एम. कुलकर्णी, आर. एस. मुतालिक उपस्थित होते. ट्रस्टचे उपाध्यक्ष भरत देशपांडे, अनुश्री देशपांडे, महेश कुलकर्णी आदींची भाषणे झाली. सीईटी परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांच्या गळ्यातील जानवे काढण्याची घटना निषेधार्ह आहे. असा अपमान कोणत्याही समाजातील विद्यार्थ्यांचा होऊ नये, घटनेच्या चौकटीत जीवन जगताना सर्व समाजांकडे आदराने पाहताना असा अपमान करणे चुकीचे आहे. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर वाणी विलास जोशी यांनी केली.









