अखेर जगभरातील अंतराळ प्रेमींना ज्या आनंद वार्तेची प्रदीर्घ काळ प्रतीक्षा होती ती खरी ठरली. स्पेस एक्सचं अंतराळयान नव्या चमूसह आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पोहोचलं आहे. याच अंतराळयानातून भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत. उद्यापासून येत्या आठवड्याभरात त्यांच्या सुखरूप स्वग्रहावरील आगमनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या वैज्ञानिकांना सुरक्षित पद्धतीने पृथ्वीवर परत आणता यावे यासाठी सर्व तांत्रिक दोष दूर करून यंत्रणा सिद्ध करण्यात आली. त्यानंतर आता त्यांचा परतीचा मार्ग सुकर होण्यास सुरुवात होणार आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळावीर फक्त आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. मात्र यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते दोघेही तिथे नऊ महिन्यांपासून अडकले होते. या दरम्यान तेथे राहून त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांना व्यक्तीश: गेले नऊ महिने या स्थानकावर अडकून पडून आपल्या प्रकृतीपासून कौटुंबिक क्षणापर्यंत अनेक बाबतीत ताण, कष्ट आणि त्रास सोसावे लागले असतील. मात्र त्यांच्या प्रदीर्घकाळाच्या उपस्थितीमुळे संकलित झालेली माहिती सुद्धा या क्षेत्रातील प्रगतीसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. ही एक चांगली बाजू असली तरी याच प्रकरणाला लागलेली एक दुर्दैवी किनारदेखील सर्वसामान्यांना अस्वस्थ करणारी आहे. अडकून पडलेल्या अंतराळवीरांना स्वग्रहावर आणण्यासाठी उठलेले वादळ अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर सुध्दा परिणाम करून गेले हे विसरता येणार नाही. केवळ राजकीय कारणामुळे ते तिथे अडकून पडलेत असा थेट हल्ला ट्रम्प यांनी केला होता. या समस्येला बायडन हेच जबाबदार आहेत असेही म्हटले होते. तर पत्रकार परिषदेत स्पेस एक्सचे कार्यकारी प्रमुख एलॉन मस्क आणि ट्रम्प यांनी दिलेल्या मुलाखतीत आपण लवकरच सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणू असे आश्वासन दिले होते. ज्यावेळी हा वाद सुरू होता तेव्हा हे अंतराळवीर अवकाशात पोहोचणारी कंपनी बोइंगने आपले यान सुस्थितीत असल्याचा वारंवार दावा केला होता. तर नासा आपल्या वैज्ञानिकांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी आग्रही होता. त्यात जवळपास पावणे तीनशे दिवस हा विषय गाजत राहिला. आता यापुढे यात जे घडेल ते एक मोठे राजकारणही असेल. कारण बोईंगच्या प्रतिस्पर्ध्याकडून या अंतराळवीरांना पृथ्वीवर आणले जाणार आहे. त्याचे मोठे परिणाम बोईंगवर होणार आहेत. या घटनेमुळे संकट काळात देखील कसे राजकारण पेटवले जाते याविषयी अमेरिकी अवतार भारतीयांना पहायला मिळाला असेही म्हणता येईल. त्यामुळे नऊ महिन्यानंतर स्पेस एक्स क्रू ड्रॅगन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जोडलं जाताना आणि हॅच ओपन होतानाचं लाईव्ह फुटेज आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक, नासा आणि स्पेसएक्स यांनी सोशल मीडियावर दाखवलं. ते जगभर प्रचंड वेगाने प्रसारित देखील झालं. याचे मुख्य कारण राजकारण नव्हतं हे निश्चित. कारण, लोकांची नजर या यानाबाबतीतील घडामोडीकडे लागून राहिली होती. पण, त्या घटनेत राजकारण घडलेच नसेल असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. दोन दिवसानंतर वैज्ञानिकांचा परतीचा प्रवास सुरू होईल आणि जगाची नजर त्यांच्या सुखरूपतेकडे लागेल. काही जाणकारांच्या मते अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासाला अजूनही थोडा उशीर होऊ शकतो. कारण हवामान अनुकूल आहे किंवा नाही याची खात्री करून पुढची वाटचाल होणार आहे. जबाबदारीचे हस्तांतर तर अधिकृतरित्या करण्यात आले आहे. जून 2024 मध्ये स्टारलायनर अंतराळयानातून बुच आणि सुनीता यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले होते. यानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अंतराळ मोहिमेत आधीच अनेक वर्षांचा उशीर झाला. या यानाला अंतराळात पाठवण्याच्या वेळेस अनेक समस्या येत होत्या. यात नासाच्या मते अशाही समस्या होत्या ज्यांचा परिणाम पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना झाला असता. यामध्ये हेलियम वायूच्या गळतीची समस्यादेखील होती. त्यामुळे नासानं निर्णय घेतला होता की सुनीता आणि बुच यांच्या पृथ्वीवरील परतीच्या प्रवासात थोडीदेखील जोखीम घेतली जाणार नाही. कारण अर्थातच त्यांच्याकडे स्पेस एक्सच्या अंतराळयानाद्वारे परतीच्या प्रवासाचा पर्याय उपलब्ध होता. अर्थात बोईंगनं सातत्यानं दावा केला आहे की सुनीता आणि बुच यांचा परतीचा प्रवास स्टारलायनर या अंतराळयानातून करणं सुरक्षित आहे. पण या देशातील मोठ्या आर्थिक शक्तींची अंतराळ क्षेत्रात असलेली चढाओढ लक्षात घेता अंतराळवीरांना अडकून पाडण्यामागे खरेच काही राजकारण, अर्थकारण, व्यावसायिक स्पर्धा असावी का? अशी शंका सामान्यांकडून व्यक्त होणे काही चुकीचे नाही. मस्क यांच्यासारख्या उद्योगपतीची विस्तारासाठी सुरू असलेली धडपड, मंगळावर सुध्दा लोकांना घेऊन जाण्यासाठी त्यांचे सुरू असणारे संशोधन यांचा विचार केला तर शास्त्रज्ञांच्या जीवितापेक्षा या कंपन्यांना आपल्या भविष्यातील लाभासाठी आवश्यक वातावरण निर्मितीला आणि प्रतिस्पर्ध्यांचे काटे काढायला राजकारण खेळले तर नवल वाटण्याचे कारण नाही. बोईंगनं काय दावा केला आणि मस्क काय म्हणाले यापेक्षा जगाला विल्यम्स आणि बूच यांना सुखरूप पृथ्वीवर आणणे महत्त्वाचे आहे. ही मोहीम आधीच अनेक अडथळ्यांमुळे चर्चेत आली असली तरी अंतराळ वैज्ञानिकांना आधी सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सुरू असणारी हालचाल महत्त्वाची. अंतराळातून स्वगृही किंवा स्वग्रही परतण्याची आस शास्त्रज्ञांना नक्कीच लागलेली असणार. त्यांना या कटकटीचा त्रास होतच असणार. पृथ्वीपासून दूर जाऊनही प्रश्न सुटत नसतील आणि ते अंतराळातून परत येतानाही वाढत असतील तर ते योग्य नाही.
Previous Articleइंडिया मास्टर्स संघाला जेतेपद
Next Article मीरा अँड्रीव्हा, जॅक ड्रेपर विजेते
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








