वृत्तसंस्था/ रायपूर (छत्तीसगड)
पहिल्यांदाच आयोजित केलेल्या इंटरनॅशनल्स मास्टर्स लीग वयस्करांच्या क्रिकेट स्पर्धेत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली इंडिया मास्टर्स संघाने लाराच्या नेतृत्वाखालील विंडीज मास्टर्स संघाचा 6 गड्यांनी दणदणीत पराभव करत अजिंक्यपद मिळविले. या अंतिम सामन्याला सुमारे 50 हजार शौकिन उपस्थित होते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीज मास्टर्स संघाने 20 षटकात 7 बाद 148 धावा जमविल्या. त्यानंतर इंडिया मास्टर्स संघाने 4 बाद 149 धावा जमवित आपला विजय नोंदविला. विंडीज मास्टर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंडिया मास्टर्सच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर विंडीजच्या फलंदाजांना मोठी फटकेबाजी करता आली नाही. कर्णधार ब्रायन लारा केवळ 6 धावांवर बाद झाला. लेंडल सिमॉन्सने अर्धशतक झळकाविताना 57 धावा झळकाविल्या. ड्वेन स्मिथने 45 धावांचे योगदान दिले. इंडियन मास्टर्स संघातील विनय कुमारने लाराचा त्रिफळा उडविला. विलियम पर्किन्स 6 धावांवर बाद झाला. शाहबाज नदीमने त्याला झेलबाद केले. स्मिथने 45 धावांच्या खेळीमध्ये 6 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पवन नेगी आणि नदीम यांनी विंडीजच्या फलंदाजांना शेवटच्या 5 षटकात चांगलेच रोखले. रवी रामपॉलने 2 धावा जमविल्या. वॉल्टनने 6 धावा केल्या. सिमॉन्सने 34 चेंडूत अर्धशतक झळकाविताना रामदिन समवेत सहाव्या गड्यासाठी 61 धावांची भागिदारी केली. सिमॉन्सने 1 षटकार आणि 5 चौकार ठोकले. इंडिया मास्टर्सतर्फे विनयकुमारने 26 धावांत 3 तर शाहबाज नदीमने 2 तर नेगी आणि बिन्नी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावाला सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडू यांनी दमदार सुरुवात करुन देताना 67 धावांची भागिदारी केली. सचिन टेंडुलकरने 25 धावा जमविल्या. सचिन बाद झाल्यानंतर रायडूने फलंदाजीची सूत्रे स्वत:कडे घेतली. रायडूने 34 चेंडूत अर्धशतक झळकाविले. रायडूने मान समवेत दुसऱ्या गड्यासाठी 28 धावांची भागिदारी केली. मानने 14 धावा केल्या. युवराज सिंगने नाबाद 13 धावा जमविल्या. अंबाती रायडूने 50 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 74 धावांची खेळी केली. युसूफ पठाण पायचीत झाला. भारताला 28 चेंडूत विजयासाठी 17 धावांची गरज होती. स्टुअर्ट बिन्नीने दोन उत्तुंग षटकार ठोकत आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले. बिन्नी 16 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक : विंडीज मास्टर्स 20 षटकात 7 बाद 148 (सिमॉन्स 57, ड्वेन स्मिथ 45, विनयकुमार 3-26, नदीम 2 बळी, बिन्नी, नेगी प्रत्येकी 1 बळी), इंडिया मास्टर्स 4 बाद 149 (अंबाती रायडू 74, सचिन तेंडुलकर 25, बिन्नी नाबाद 16, नर्स 2-22).









