आरएसपुरा सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) बीएसएफ जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घातले. ही घटना 4 आणि 5 एप्रिलच्या मध्यरात्री जम्मूमधील नियंत्रण रेषेवरील आरएसपुरा सेक्टरमध्ये घडली. रात्रीच्या गस्तीवेळी सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्यानंतर संबंधित घुसखोरावर कारवाई करण्यात आली. अब्दुलियान सीमा चौकीवर तैनात असलेल्या सैनिकांनी एका व्यक्तीला सीमा ओलांडताना पाहिले. त्यानंतर इशारा दिल्यानंतरही न थांबता तो भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत राहिला. त्यानंतर सैनिकांनी त्याच्यावर गोळीबार केल्यामुळे तो जागीच मृत पावला. त्याच्याकडील सर्व स्फोटक साहित्य आणि दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
यापूर्वी 1 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर लष्कराने 4-5 पाकिस्तानी घुसखोरांना ठार मारले होते. ही घटना पूंछमधील नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी सेक्टरच्या पुढच्या भागात घडली. 1 एप्रिल रोजी नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात 3 सुरुंगांचे स्फोट झाल्यानंतर पाकिस्तानकडूनही गोळीबार झाला. प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने गोळीबार केल्यानंतर 4 ते 5 घुसखोर मारले गेले.









