प्रतिनिधी/ निपाणी
अकोळ येथे ट्रॅक्टर-दुचाकी अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 6.30 च्या सुमारास घडली. महादेव वडर (वय 60) असे गंभीर जखमीचे नाव आहे. दुचाकीवरून भोलाराम वडर व महादेव वडर हे हिटणीहून भोजकडे जात होते. दरम्यान, अकोळ येथे गणपती मंदिरनजीक आले असता ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. दुचाकीवरील मागे बसलेले महादेव वडर हे जोरात खाली कोसळल्याने त्यांचे दोन्हीही पाय कट झाले आहेत.
त्यांना 108 रुग्णवाहिकेतून एम. टी. रोहित यांनी त्वरित महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हवालदार हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी इस्पितळाला भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज नाईकवडी करीत आहेत.









