अजूनही काही नगरसेवकांना गांभीर्य नसल्याचे स्पष्ट
बेळगाव : नगरसेवकांनी दरवर्षी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला पाहिजे. मात्र 28 नगरसेवकांनी तपशील दिला नव्हता. त्यामुळे त्यांना सोमवार दि. 27 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. सोमवारी काही नगरसेवकांनी आपल्या मालमत्तेचा तपशील मनपा कौन्सिल विभागाकडे दिला आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी आपल्या मालमत्तांचा तपशील दिला आहे. मात्र विरोधी गटातील काही नगरसेवकांनी अजूनही सदर वार्षिक तपशील देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधित नगरसेवकांची माहिती लोकायुक्तांकडे दिली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आता दरवर्षी सदर मालमत्तेचा तपशील नगरसेवकांनी दिला पाहिजे. दरवर्षी त्यामध्ये किती वाढ झाली आहे, अथवा कमी झाली आहे, याचा उल्लेख करून हा तपशील दिला पाहिजे. त्यामुळे नगरसेवकांना याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. मालमत्ता तपशील देण्याचा आदेश असला तरी याबाबत काहीजण गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. खासदार, आमदार आपला तपशील देत नाहीत. त्यामुळे आम्हाला काय होणार? असे काही नगरसेवकांचे म्हणणे आहे. मात्र नियमानुसार हा अहवाल देणे बंधनकारक असल्याने सोमवारी बहुसंख्य नगरसेवकांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिल्याचे कौन्सिल विभागाने सांगितले आहे. मात्र याबाबत पूर्ण आकडेवारी मिळू शकली नाही.









