आनंद अकादमीचा विजय
बेळगाव : प्रमोद पालेकर अकादमी आयोजित बालाजी चषक 13 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत आनंद अकादमीने प्रमोद पालेकर अकादमीचा 207 धावांनी पराभव करुन विजय मिळविला. ओजस गडकरीने दमदार शतक झळकविले. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने 20 षटकात 3 गडी बाद 248 धावा केल्या. त्यात ओजस गडकरीने 12 चौकारासह नाबाद 108 धावा केल्या. त्याला सात्विकने 45 धावा, शौर्यने 27 धावा करुन सुरेख साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रमोद अकादमीचा डाव 10 षटकात सर्वगडी बाद 41 धावांत आटोपला. पालेकर अकादमीचा एकही खेळाडू दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. आनंद अकादमीतर्फे रोशन, शौर्य, कबीर, अंगद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.









