‘आप’ची सर्वोच्च न्यायालयात याचिका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पक्षाच्या महापौरपदाच्या उमेदवार शैली ओबेरॉय यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी सुनावणी करत दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना आणि अन्य काही जणांना नोटीस बजावली आहे. दिल्ल्लीच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत नामनिर्देशित सदस्यांना मतदान करण्याची अनुमती देण्याच्या उपराज्यपालांच्या निर्णयाला ओबेरॉय यांनी आव्हान दिले आहे.
आप नेत्या शैली ओबेरॉय तसेच अन्य काही जणांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दिल्ली महापालिका सभागृहात गोंधळ झाल्याने सोमवारी देखील महापौरपदाची निवडणूक टळली होती. याचिकेद्वारे महापौरपदाची निवडणूक लवकरात लवकर करविण्याची मागणी करण्यात आली आहे.
यापूर्वी महापौरपदाची निवडणूक रोखल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने भाजप कार्यालयाबाहेर निदर्शने केली होती. भाजप वारंवार महापौर निवडणुकीत अडथळे निर्माण करत आहे. महापालिका सभागृहात पूर्ण बहुमत असूनही आपचा महापौर होऊ देण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. या निदर्शनांचे नेतृत्व आमदार सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि कुलदीप कुमार यांनी केले होते. तर भाजपनेही आम आदमी पक्षाच्या विरोधात निदर्शने केली होती.









