पंतप्रधान मोदींकडून राहुल गांधींवर शरसंधान : अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळला : काँग्रेसचे गटनेते अधीर चौधरी सभागृहातून निलंबित
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. मणिपूरच्या भूमीचा राजकारणासाठी वापर करू नका. देशासमोरील समस्यांवर आम्ही मिळून मार्ग काढूया असे आवाहन मोदींनी विरोधकांना केले. मणिपूरवर मोदींनी बोलण्यास सुरुवात करण्यापूर्वीच विरोधी पक्षांनी सभात्याग केला होता. देशाच्या नावाचा वापर करून स्वत:ची विश्वसनीयता वाढविता येईल असे युपीएला वाटतेय. ही इंडिया आघाडी नसून अहंकारी आघाडी आहे. याच्या वरातीत सामील प्रत्येक जण ‘वर’ होऊ पाहतोय, सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे. विरोधी पक्ष ‘मोहब्बत की दुकान’ चालवत असल्याचे म्हणत आहेत, परंतु त्यांचे हे ‘लूट करणारे दुकान’ असून असत्याचा बाजार असल्याचे जनताच म्हणतेय असे उद्गार काढत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर घणाघात चढविला आहे. तर सरकारविरोधात दाखल अविश्वासाचा प्रस्ताव लोकसभेत आवाजी मतदानाने फेटाळला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहातून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. चौधरी यांनी मोदींना ‘नीरव मोदी’ची उपमा दिली. तसेच महाभारतातील एका प्रसंगाचा उल्लेख करत मोदींची कथित स्वरुपात धृतराष्ट्राशी तुलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे.
मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवणार
मणिपूरमध्ये न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्भवलेली स्थिती आम्ही जाणतो. हिंसेचा काळ सुरू झाला, कुटुंबांनी स्वत:चे आप्त गमाविले, महिलांसोबत गंभीर गुन्हे घडले असून ते अक्षम्य आहेत. दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी केंद्र-राज्य मिळून काम करत आहेत. सध्या जे प्रयत्न सुरू आहेत, ते पाहता नजीकच्या भविष्यात मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य अवश्य उगवणार असे आश्वासन देशवासियांना देऊ इच्छितो. मणिपूर पुन्हा नव्या आत्मविश्वासासह वाटचाल करणार आहे. देश अन् सभागृह तुमच्यासोबत आहे असे मणिपूरच्या लोकांना, माता-भगिनींना सांगू इच्छितो. राज्य पुन्हा विकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्यासाठी आम्ही प्रयत्न कमी पडू देणार आही. ईशान्य आमच्या हृदयात असल्याचे मोदी म्हणाले.
काँग्रेसकडून तुष्टीकरणाचे राजकारण
वंदे मातरम् गीताने देशाच्या कानाकोपऱ्यात चेतना जागविली. परंतु तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे वंदे मातरम् गीताचेही तुकडे करण्यात आले. हे लोक भारत तेरे तुकडे होंगे गँगला बळ देण्यास पोहोचतात. सिलिगुडी कॉरिडॉर ताब्यात घेत ईशान्येला देशापासून तोडू पाहणाऱ्या लोकांना विरोधी पक्ष मदत करत आहेत. काँग्रेसचे प्रत्येक काम राजकारण, निवडणुकीभोवती फिरणारे असते. सावत्र वागणूक देणे काँग्रेसच्या डीएनएत आहे. ईशान्येतील समस्यांची एकमात्र जननी काँग्रेस आहे. काँग्रेसच्या राजकारणामुळे तेथे समस्या निर्माण झाल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला आहे.
मेंदूसोबत मनाची स्थिती देशाला समजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान लोकसभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. बुधवारी या सभागृहात मन:पूर्वक बोलावे असे म्हटले गेले होते, त्या व्यक्तीच्या मेंदूची स्थिती देश दीर्घकाळापासून जाणून आहे, परंतु आता त्यांच्या मनाचीही स्थिती समजली. त्यांचे मोदीप्रेम इतके जबरदस्त आहे की ते 24 तास स्वप्नातही त्यांच्या मोदीच येतो. मी जर भाषणावेळी पाणी पिलो तरीही ते मोदीला पाणी पाजले असे म्हणू लागतात. मी काँग्रेसची समस्या समजू शकतो. अनेक वर्षांपासून एकच अयशस्वी प्रॉडक्ट वारंवार लाँच करत आहेत, याचा परिणाम म्हणून मतदारांबद्दलचा त्यांचा द्वेष गगनाला भिडला आहे. त्यांचे लाँचिंग अयशस्वी ठरते आणि ते जनतेचा द्वेष करू लागतात. परंतु पीआरवाले आता ‘मोहब्बत की दुकान’चा प्रचार करत आहेत. तर हे लूट करणारे दुकान असून असत्याचा बाजार असल्याचे जनता म्हणत आहे. सभागृहात आदल्या दिवशी काही लोक हनुमानाने नव्हे तर अहंकारामुळे लंका जळली असे म्हणत होते. याचमुळे बहुधा काँग्रेस 400 वरून 40 आकड्यावर आला असावा. द्वेषाचे दुकान चालविणाऱ्यांनी सैन्याचा सन्मान विकल्याचा शाब्दिक हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर चढविला आहे.
गुड का गोबर
लोकसभेत बोलताना मोदींनी काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर उपहासात्मक टिप्पणी केली आहे. विरोधी पक्षातील सर्वात मोठ्या नेत्याचे नाव प्रस्तावावर बोलणाऱ्यांच्या यादीत नव्हते. अधीर चौधरींना त्यांच्याच पक्षाने बोलण्याची संधी दिली नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी अधीर चौधरींना डावलणे योग्य नसल्याचे म्हटल्यावर पक्षाने त्यांना बोलण्याची संधी दिली. परंतु अधीर रंजन चौधरी हे ‘गुड का गोबर’ करण्यात तरबेज आहेत. त्यांना कदाचित कोलकात्यातून फोन आल्याने काँग्रेसने वक्त्यांच्या यादीतून वगळले असावे. काँग्रेस वारंवार त्यांचा अपमान करते. कधी निवडणुकीच्या नावावर त्यांना तात्पुरत्या स्वरुपात गटनेतेपदावर हटविले जाते. आम्ही अधीर चौधरींबद्दल पूर्ण संवेदना व्यक्त करतो अशी उपरोधिक टिप्पणी मोदींनी केली आहे.
काँग्रेसला नाही जाण
अन्य विरोधी पक्ष ज्या काँग्रेसमागून जाऊ पाहत आहेत, त्याच्याकडे या देशाच्या संस्कारांबद्दल जाण नाही. पिढीगत स्वरुपात हे लोक लाल मिरची अणि हिरव्या मिरचीतील फरक समजू शकले नाहीत असे म्हणत ज्याला केवळ नावाचा आसरा आहे, अशांसाठी ‘दूर युद्ध से भागते, नार रखा रणधीर, भाग्यचंद्र की आज तक सोई है तकदीर’ अशी काव्यपंक्ती मोदींनी सभागृहात सादर केली. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठीही विरोधी पक्षांना ‘एनडीए’चा आसरा घ्यावा लागला आहे. परंतु सवयीनुसार घमेंडचा ‘आय’ कायम राहिल्याने आघाडीच्या नावात ‘आयएनडीआयए’मध्ये दोन आय जोडण्यात आले. पहिला आय हा 26 पक्षांच्या अहंकारासाठी तर दुसरा आय हा एका कुटुंबाच्या अहंकारासाठी असल्याचे टीकास्त्र मोदींनी केले आहे.
शुभ काळात विरोधकांचे वर्तन ‘काले टीके’सारखा
विरोधकांमध्ये अविश्वास असून ते सत्यापासून दूर पाहत आहेत. अविश्वास अन् अहंकार त्यांच्या कणाकणांमध्ये सामावला आहे. त्यांच्या या शहामृगी पवित्र्यासाठी कुणीच काही करू शत नाही. जेव्हा काही शुभ होते, तेव्हा काला टीका लावावा असे जुन्या काळात म्हटले जायचे. आज देशाचे कौतुक होतेय, जयजयकार होतोय अशा स्थितीत ‘काले टीके’च्या स्वरुपात (टीठ) काळे परिधान करून सभागृहात येत तुम्ही या मंगलकार्यात काला टीका लावल्याने मी विरोधकांचे आभार मानतो.
विरोधकांचा नो बॉल, सरकारची सेंच्युरी
मणिपूरसंबंधी विरोधी पक्षांनी केलेली चर्चा पाहता त्यांचे बोलविते धनी दु:खी आहेत. फील्डिंग विरोधकांनी लावली, तर चौकार-षटकार सरकारकडून मारण्यात आले. विरोधी पक्ष अविश्वास प्रस्तावावर नो बॉलवर नो बॉल टाकत होते. तर सरकारकडून सेंच्युरी ठोकत आहे. विरोधी पक्षांनी काहीतरी मेहनत करून यावी असे मी त्यांना सांगू इच्छितो. 2018 मध्ये विरोधकांना मेहनत करून येण्यास सांगितले होते, परंतु 5 वर्षांत काहीच बदलले नसल्याची खोचक टिप्पणी मोदींनी विरोधी पक्षांना उद्देशून केली आहे.
2028 मध्येही अविश्वास प्रस्ताव आणाल
विरोधी पक्ष जेव्हा 2028 मध्ये अविश्वास प्रस्ताव घेऊन येतील, तेव्हा भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणार आहे. विरोधी पक्षांची मानसिकता अविश्वासाने व्यापलेली असून आम्ही केलेल्या कामाची त्यांनी प्रत्येकवेळी टिंगल केली आहे. आम्ही स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडियाबद्दल बोलल्यावर विरोधी पक्षांनी भारताचे लोक निरक्षर असल्याचे म्हटले. आम्ही मेक इन इंडियाबद्दल बोलल्यावर त्यनी त्याचीही चेष्टा केली. भारताच्या सामर्थ्यावर काँग्रेस अन् त्यांच्या मित्रांचा कधीच विश्वास राहिला नसल्याचा इतिहास असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच युपीएवर अंत्यविधी
विरोधी पक्षांच्या साथीदारांबद्दल मी संवेदना व्यक्त करू इच्छितो. काही दिवसांपूर्वीच बेंगळूर येथे मिळून-जुळून सुमारे 2 दशकांपूर्वीच्या युपीएवर त्यांनी अंत्यविधी केले आहेत. लोकशाही वर्तनानुसार मी तेव्हाच संवेदना व्यक्त करणे अपेक्षित होते, परंतु या विलंबासाठी मी जबाबदार नाही. कारण विरोधी पक्ष एकीकडे युपीएवर अंत्यविधी करत असताना दुसरीकडे पडझड झालेल्या वास्तूवर नवे प्लास्टर लावण्याचा जल्लोष करत होते अशी उपरोधिक टिप्पणी करत मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे.
शेअरबाजार गुंतवणुकदारांना गुरुमंत्र
लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदींनी शेअरबाजाराच्या गुंतवणुकदारांना गुरुमंत्र दिला आहे. विरोधी पक्ष ज्या सरकारी कंपन्यांवर टीकाटिप्पणी करतात, त्याच्या समभागांमध्ये गुंतवणूक करा, चांगला परतावा मिळेल. संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अनेक दावे केले होते, परंतु एचएएलने आतापर्यंतच्या स्वत:च्या इतिहासात मागील आर्थिक वर्षात सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे. तर एलआयसी ही विमा कंपनी तोट्यात जाणार असल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला होता, परंतु आज एलआयसी सातत्याने मजबूत होत आहे. याचमुळे विरोधी पक्ष ज्या सरकारी कंपन्यांवर टीका करतील, त्याचे समभाग खरेदी करा, तुम्हाला लाभ होईल असे म्हणत मोदींनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे.
विक्रमी संख्याबळासह सत्तेवर येऊ
मी देवाचे आभार मानतो की त्याने विरोधकांना अविश्वास प्रस्ताव आणण्याचे सुचविले. 2018 मध्येही त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यावेळी हे आमच्या सरकारसाठी बहुमत चाचणी नसून विरोधकांचे फ्लोअर टेस्ट असल्याचे मी म्हणालो होतो. घडले देखील तेच. जेव्हा मतदान झाले तेव्हा विरोधकांना स्वत:चे संख्याबळही राखता आले नव्हते. जेव्हा आम्ही जनतेसमोर (2019) गेलो तेव्हा जनतेने देखील पूर्ण शक्तिनिशी विरोधी पक्षांसाठी अविश्वास घोषित केला. निवडणुकीत रालोआला पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. 2024 च्या निवडणुकीतही रालोआ अन् भाजप जुने विक्रम मोडीत काढून जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे.
अनेक राज्यांमध्ये काँग्रेसवर अविश्वास
देशाच्या अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला विजय मिळवून कित्येक दशकं उलटली आहेत. तामिळनाडूत काँग्रेस यापूर्वी 1962 मध्ये सत्तेवर आला होता, 61 वर्षांपासून तेथील लोक काँग्रेसवर अविश्वास असल्याचे सांगत आहेत. बंगालमध्ये 1972, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहारमध्ये 1985 मध्ये काँग्रेसने अखेरचा विजय मिळविला होता. त्रिपुरात 1988 तर ओडिशात 1995 आणि नागालँडमध्ये 1998 मध्ये अखेरचा विजय प्राप्त केला होता. दिल्ली, आंध्रप्रदेश, बंगलामध्येही काँग्रेसचा आता एकही आमदार नाही. जनतेने काँग्रेसबद्दल सातत्याने अविश्वास घोषित केला असल्याची टिप्पणी करत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.
काँग्रेसने गांधी नावही चोरले
मतदारांना आकर्षित करण्यासाठी गांधी नाव देखील काँग्रेसने प्रत्येकवेळी चोरले. निवडणूक चिन्ह पाहिल्यास बैल, गाय-वासरू, मग हाताचा पंजा निवडला, त्यांचे हे कारनामे त्यांची मनोवृत्ती दर्शविते. सर्वकाही एका कुटुंबाच्या हातात केंद्रीत झाले आहे. दरबारवादामुळे त्यांनी अनेक महान लोकांना उद्ध्वस्त केले.
सभात्यागावर निशाणा
लोकशाहीवर ज्यांचा विश्वास नसतो, ते ऐकविण्यास तयार असतात, परंतु ऐकून घेण्याचे धैर्य त्यांच्यात नसते. अपशब्द बोला, अन् पळून जा, कचरा फेका अन् पळ काढा, खोटे बोला अन् पसार व्हा अशी त्यांची वृत्ती असल्याची टीका मोदींनी विरोधी पक्षांवर केली आहे.
मोदींचे घणाघात…
- मणिपूर हिंसाचाराचा वापर राजकारणासाठी करू नका
- विरोधकांची इंडिया आघाडी नसून अहंकारी आघाडी
- तुकडे तुकडे गँगला विरोधी पक्षांकडून होतेय मदत
- एकच अयशस्वी प्रॉडक्ट वारंवार लाँच केल्याने निराशा
- भारताच्या सामर्थ्यावर नाही विरोधी पक्षांचा विश्वास
- युपीएचा अंत्यविधी करण्यात आल्याने व्यक्त करतो संवेदना
- अविश्वास प्रस्ताव आणण्याची बुद्धी दिल्याने देवाचे आभार
- विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव रालोआसाठी शुभचिन्ह
- 2024 मध्ये अधिक संख्याबळासह सत्तेत येणार हे निश्चित









