वृत्तसंस्था /नवी दिल्ली
तामिळनाडूतील शहर कोईंबतूर येथे झालेल्या कारबाँब स्फोटप्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) 23 स्थानी धाडी घातल्याचे वृत्त आहे. धाडी घातलेल्या स्थानांमध्ये राज्यातील सत्ताधारी द्रमुकच्या काही कार्यकर्त्यांच्या स्थानांचाही समावेश आहे. कोईंबतूर महानगरपालिकेच्या द्रमुकच्या नगरसेविका एम. मुबासीरा यांच्या कार्यालयावर आणि घरावर धाड घालण्यात आली आहे. याच प्रकरणात या महिन्याच्या प्रारंभी एनआयएने महम्मद अझरुद्दिन नामक आरोपीला अटक केली होती. त्याला कोठडीत ठेवण्यात आले आहे. या स्फोटात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली असून त्या आधारे हा तपास सुरु आहे. गेल्या वर्षी 23 ऑक्टोबरला हा स्फोट कोट्टाइ संगमेश्वरर थिरुकोविल येथे झाला होता. त्यात हा स्फोट घडविणारी संशयित जमेशा मुबीन ही महिला ठार झाली होती. या प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपपत्रे सादर करण्यात आली असून अद्याप तपास सुरु आहे.









