वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी इराणवर आणखी आर्थिक निर्बंध घालत असल्याची घोषणा केली आहे. इराणमध्ये सरसकट व क्रूर पद्धतीने मानवअधिकारांची पायमल्ली होत आहे. मूलभूत अधिकार मागणाऱ्या महिलांवर अत्याचार करण्यात येत आहेत. इराण प्रशासनाची ही कृती गंभीर असून त्यामुळे अधिक कठोर आर्थिक निर्बंध घालण्यात येत असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. इराणमध्ये मानवाधिकारांसाठी मोठे आंदोलन उभे राहिले आहे. त्याला कारण महसा अमीनी ही युवती ठरली होती. या युवतीने हिजाब नियमानुसार बांधला नाही म्हणून इराणच्या प्रशासनाने तिला अटक केली होती. तिचा तीन दिवसांनी कारागृहात संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे सर्वसामान्य इराणी नागरीक रस्त्यांवर उतरला होता. आंदोलकांमध्ये महिलांची संख्या प्रचंड होती. अजूनही या आंदोलाचे पडसाद उमटत आहेत. या महसा अमीनी या युवतीचा शुक्रवारी प्रथम मृत्यूदिन होता. याच दिवशी बायडेन यांनी इराणवर अधिक निर्बंध घालण्याची घोषणा केली. इराणच्या दमनकारी राजवटीशी लढा देणाऱ्या धाडसी आंदोलकांच्या पाठीशी अमेरिका नेहमीच उभी राहील हा संदेश आपण देत आहोत. त्यासाठी याच दिवशी हे नवे निर्बंध लादण्यात येत आहेत, असे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.









