वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
तिरंगी टी-20 मालिकेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱया सामन्यात यजमान न्यूझीलंडने बांगलादेशचा 13 चेंडू बाकी ठेऊन आठ गडय़ांनी दणदणीत पराभव केला. न्यूझीलंड संघातील मायकेल ब्रेसवेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजी दिली. बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 137 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 17.5 षटकात 2 गडय़ांच्या मोबदल्यात 142 धावा जमवित विजय नोंदविला.
बांगलादेशच्या डावामध्ये सलामीच्या नईमूल हुसेनने 29 चेंडूत 4 चौकारासह 33, लिटॉन दासने 2 चौकारासह 15, अतिफ हुसेनने 26 चेंडूत 24, मेहदी हसन मिराजने 1 चौकारासह 5, मोसदेक हुसनने 2, यासीर अलीने 1 चौकारासह 7, कर्णधार शकीब अल हसनने 1 चौकारासह 16 आणि नुरुल हसनने 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 25 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 5 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. त्यांच्या डावामध्ये 2 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे बोल्ट, साऊदी, ब्रेसवेल आणि सोधी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात सलामीच्या ऍलेनने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा जमविताना कॉनवेसमवेत पहिल्या गडय़ासाठी 4 षटकात 24 धावांची भर घातली. ऍलेन बाद झाल्यानंतर कॉन्वे आणि कर्णधार विल्यम्सन यांनी दुसऱया गडय़ासाठी 11 षटकात 85 धावांची भागीदारी केली. विल्यम्सनने 29 चेंडूत 1 चौकारासह 30 धावा जमविल्या. कॉनवे आणि फिलिप्स या जोडीने विजयाचे सोपस्कार 17.5 षटकात पूर्ण केले. कॉनवेने 51 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 70 तर फिलिप्सने 9 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 23 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम आणि हसन मेहमूद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः बांगलादेश 20 षटकात 8 बाद 137 (नजमुल हुसेन 33, लिटॉन दास 15, अफिफ हुसेन 24, शकीब अल हसन 16, नुरुल हसन नाबाद 25, बोल्ट 2-25, साऊदी 2-34, ब्रेसवेल 2-14, सोधी 2-31), न्यूझीलंड 17.5 षटकात 2 बाद 142 (ऍलेन 16, कॉनवे नाबाद 70, विल्यम्सन 30, फिलिप्स नाबाद 23, एस. इस्लाम 1-39, हसन मेहमूद 1-26).









