लोकांशी साधला संवाद ः सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा वर्षाव
वृत्तसंस्था / चेन्नई
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या चेन्नईच्या मायलपूर बाजारात भाज्या खरेदी करण्यासाठी पोहोचल्या. येथे त्यांनी भाज्या खरेदी करण्यासोबत लोकांशी संवाद देखील साधला. सीतारामन यांच्या कार्यालयाने याचा व्हिडिओ अन् छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. अर्थमंत्र्यांना पाहून बाजारत लोकांची गर्दी झाली. काही लोकांनी अर्थमंत्र्यांसोबत छायाचित्रेही काढून घेतली आहेत.
अर्थमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाच्या हातात गन पाहून भाजी विक्रेते प्रथम घाबरून गेले होते, परंतु अर्थमंत्रीच भाजी खरेदीसाठी पोहोचल्याचे कळताच त्यांना आनंद झाला. अर्थमंत्र्यांसोबत यावेळी भाजप आमदार वनथी श्रीनिवासन देखील होत्या. निर्मला सीतारामन या बालपणी मायलपूर येथे राहण्यासाठी यायच्या असे श्रीनिवासन यांनी सांगितले आहे.
देशात महागाई सातत्याने वाढत असताना अर्थमंत्री सीतारामन यांनी भाजी मार्केटचा हा दौरा केला आहे. देशात अन्नधान्याच्या किमती वाढत असल्याने सोशल मीडियावर अनेक युजर्सनी अर्थमंत्र्यांकडून जीएसटी आकारणे विसरू नका अशी कॉमेंट केली आहे.
देशात वाढत्या महागाईमध्ये भाज्यांचे दर सर्वाधिक वाढले आहेत. केंद्र सरकार महागाई दर 4 टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. लोकांना आवश्यक सामग्री वेळेत आणि योग्य दरात मिळावेत म्हणून पावले उचलली जात असल्याचे सीतारामन यांनी यापूर्वी सांगितले होते.









