परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचण
बेळगाव : भाग्यनगर दहावा क्रॉस परिसरात जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र दुरुस्तीनंतरही येथे खोदण्यात आलेला खड्डे बुजविण्यात आला नाही. त्यामुळे परिसरातून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचणीचे बनले आहे. तसेच रस्ते करतेवेळी संपर्क रस्त्यांवर रॅम्प करण्यात आले नसल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी वाया जात होते. याची दखल घेऊन जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतरही खोदण्यात आलेला खड्डे बुजविण्यात आलेला नाही. खड्यांच्या सभोवती मातीचा ढीग साचला असून, बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पण खड्डे बुजविण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. परिणामी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने सतत वाहनांची ये-जा सुरू असते, पण रस्त्याशेजारी असलेल्या या खड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असल्यास खड्डे बुजविण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
व्यवस्थित रॅम्प बनवावेत
मुख्य रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. तसेच काही रस्त्यांचे डांबरीकरण देखील करण्यात येत आहे. संपर्क रस्ते जोडण्याच्या ठिकाणी रॅम्प केले जात नाही त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. रॅम्प बनविण्याची जबाबदारी संबंधीत कंत्राटदाराची आहे. पण याकडे कानाडोळा करण्यात आल्याने वाहनधारकांचे अपघात होत आहेत. रस्त्याचा विकास करताना व्यवस्थित रॅम्प बनविण्यात यावेत, अशी मागणी होत आहे.









