धारवाड महामार्ग प्राधिकरणाचा कानाडोळा
बेळगाव : बेळगाव-खानापूर-पणजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 वर इतर भाषांसह मराठी भाषेतही फलक लावण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रादेशिक कार्यालयाने दिल्या आहेत. तरीदेखील धारवाड येथील महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून मराठीतून फलक लावण्याकडे दुर्लक्ष होत आहे. इतर भाषेप्रमाणेच मराठीत फलक लावा, अशी मागणी असतानाही केवळ मराठीची कावीळ असल्यामुळे अधिकारीवर्गातून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव-पणजी महामार्गासाठी सर्वाधिक मराठी भाषिकांच्याच जमिनी घेण्यात आल्या. बेळगाव व खानापूर तालुक्यात बहुलभाषिक मराठी आहेत. तसेच गोव्याला जाणारे नागरिकही मराठी असल्यामुळे मराठी भाषेतील फलकांचा आग्रह धरला जात होता. युवा समितीच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदनही दिले होते. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयालाही पत्र लिहिण्यात आले. या पत्राची दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धारवाड येथील प्रादेशिक कार्यालयाला सूचना देण्यात आल्या. मराठी भाषेतूनही फलक लावावेत, अशा सूचना करून अनेक दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची डोळेझाक सुरू आहे. नागरिकांच्या सेवेसाठी मराठी भाषेतून फलक गरजेचे असताना दुर्लक्ष केले जात असल्याने युवा समितीने नाराजी व्यक्त केली आहे.









