लोकसभा निवडणुकीपर्यंत पदावर राहणार ः भाजप कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱया दिवशी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मुदतवाढीला मंजुरी देण्यात आली. नड्डा यांचा कार्यकाळ पुढील जवळपास दीड वर्षासाठी म्हणजेच जून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. भाजपच्या कार्यकारिणीत हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी जाहीर केले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यासंबंधीचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी त्याला एकमताने मंजुरी दिली.
जे. पी. नड्डा यांना जून 2019 मध्ये कार्यकारी अध्यक्ष आणि 20 जानेवारी 2020 रोजी पूर्णवेळ अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ 20 जानेवारीला संपत असतानाच दिल्लीत आयोजित भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार आता नड्डा यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. लालकृष्ण अडवाणी आणि अमित शहा यांच्यानंतर सलग दुसऱयांदा सत्ता मिळवणारे ते तिसरे नेते ठरले आहेत. यापूर्वी राजनाथ सिंह हेसुद्धा दोनदा पक्षाचे अध्यक्ष बनले होते. पण त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली भाजप 2024 मध्ये आणखी मोठय़ा बहुमताने विजयी होईल, असा मला विश्वास असल्याचे अमित शहा म्हणाले. तसेच नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व करतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. भाजपचे उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा यांनी पत्रकारांना बैठकीत झालेल्या चर्चेची पत्रकार परिषदेत माहिती दिली.
प्रस्तावात पंतप्रधानांचे कौतुक
मंगळवारी कार्यकारिणीचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. आजच्या बैठकीत सामाजिक-आर्थिक प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या धोरणांमुळे भारत जगातील पाच मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे, असे या ठरावात म्हटले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 4 वाजता सर्व अधिकाऱयांना संबोधित केले. पंतप्रधानांच्या भाषणानंतर दोन दिवसीय बैठकीची सांगता झाली.
येत्या दीड वर्षात निवडणुकांचे मोठे आव्हान
पुढील वषी 2024 मध्ये पंतप्रधान मोदी तिसऱयांदा देशातील जनतेकडून सार्वमत मागणार आहेत. त्याआधी 2023 मध्ये 9 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुका सार्वत्रिक निवडणुकांबाबत राजकीय समज निर्माण करण्यात भूमिका बजावतात. यामध्ये विशेषतः मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक या राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी लोकसभेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
निवडणुकीसाठी रणनीती ठरली
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर स्वतंत्रपणे चर्चा झाली. यावषी त्रिपुरा, नागालँड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी बहुतांश राज्यांमध्ये भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांची सत्ता आहे. बैठकीत या राज्यांतील सत्ता टिकवण्याबरोबरच राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पुन्हा सत्तेवर येण्याबाबत गंभीर चर्चा झाली. विशेषतः छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकांकडे केंद्रातील सत्तेची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.
जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली ः जयशंकर
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत जी-20 च्या भारताच्या अध्यक्षपदावर विधान केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षात जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा बदलली आहे, असे ते म्हणाले. तसेच भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्या सुधा यादव यांनी काँग्रेस नेत्यावर खोटे दावे केल्याचा आरोप केला. सरकारच्या कल्याणकारी धोरणांमुळे कोटय़वधी लोकांचा फायदा होत असल्याची आकडेवारी न पाहता राहुल गांधी तेच मुद्दे मांडत आहेत. सरकारने गेल्या नऊ वर्षांत एससी, एसटी, गरीब आणि मागासवर्गासाठी दिलेले योगदान अभूतपूर्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशवासियांबरोबरच जगातील अन्य देशांचा विचार करताना भारत आपली अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यातही यशस्वी ठरल्याचा दावा बैठकीमध्ये करण्यात आला.









