वृत्तसंस्था/ केपटाऊन
भारतीय महिला हॉक संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असून उभय संघामध्ये चार सामन्यांची हॉकी कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 5-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला.
भारताची माजी कर्णधार राणी रामपालने या मालिकेतील पहिल्या सामन्यात आपले दमदार पुनरागमन करताना गोल नोंदवला. गेल्या जूनमध्ये झालेल्या महिलांच्या हॉकी प्रो लिग स्पर्धेत राणी रामपालने आपला शेवटचा सामना बेल्जियम विरुद्ध खेळला होता. त्यानंतर तब्बल सात महिन्यांच्या कालावधीने तिचे राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतातर्फे राणी रामपालने 12 व्या मिनिटाला, मोनिकाने 20 व्या मिनिटाला, नवनीत कौरने 24 व्या, गुरुजित कौरने 25 व्या आणि संगीता कुमारीने 30 व्या मिनिटाला गोल केले. भारताचे हे पाचही गोल सामन्याच्या पूर्वार्धात झाले. मध्यंतरापर्यंत भारताने दक्षिण आफ्रिकेवर 5-0 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. दक्षिण आफ्रिकेतर्फे एकमेव गोल 44 व्या मिनिटाला कर्णधार क्विनेटा बॉब्सने नोंदवला. गेल्या वर्षी झालेल्या युनिफेर 23 व्या वर्षाखालील वयोगटाच्या पाच देशांच्या महिलांच्या कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱया वैष्णवी फाळकेचे द. आफ्रिका विरुद्धच्या कसोटी वरिष्ठ गटात पदार्पण झाले.









