आयपीएल 18 : वानखेडेवर मुंबईचा 4 गड्यांनी विजय : सामनावीर विल जॅक्सची अष्टपैलू खेळी : हैदराबादवर आयपीएलमधून बाहेर पडण्याचे संकट
वृत्तसंस्था/मुंबई
मुंबई इंडियन्सने सलग 2 सामने जिंकून आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाने सनरायझर्स हैदराबादला घरच्या मैदानावर 4 गडी राखून पराभूत केले. यासह, मुंबईने हंगामातील तिसरा विजय नोंदवला. दरम्यान, गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील खेळाडू पॅट कमिन्सच्या सनरायझर्स संघाला विजयाची लय कायम राखता आली नाही आणि त्यांना या हंगामातील पाचवा सामना गमावावा लागला. या पराभवामुळे हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. जवळपास ते आयपीएल 2025 मधून बाहेर गेले आहेत. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने हैदराबादला 162 धावांत रोखले. यानंतर मुंबईने हे आव्हान सहजपणे पूर्ण करत हैदराबादला पराभवाचा धक्का दिला. तिलक वर्माने यावेळी 21 आणि हार्दिक पंड्याने 21 धावांची खेळी साकारली. सामनावीर पुरस्कार मिळवलेल्या विल जॅक्सने अष्टपैलू खेळी साकारत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
वानखेडेवर मुंबईचा सहज विजय
मुंबईचा संघ 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला आणि रोहित शर्माने संघाला जोरदार सुरुवात करून दिली. रोहितने यावेळी दमदार तीन षटकार लगावले आणि त्याने सर्वांची मने जिंकली. पण यावेळी पुन्हा एकदा रोहित मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. रोहितने यावेळी 16 चेंडूंत 3 षटकारांच्य्या जोरावर 26 धावा केल्या. रोहितनंतर फलंदाजीला आलेल्या विल जॅक्सने यावेळी संघाला सावरले. जॅक्स फलंदाजी करत असताना रायन रिक्लेटन 23 चेंडूंत 31 धावा करून माघारी परतला. सूर्यकुमार यादवही या सामन्यात आपली छाप पाडू शकला नाही. सूर्याने या सामन्यात 15 चेंडूंत 26 धावा केल्या. सूर्या बाद झाल्यावर विल जॅक्सच्या साथीला आला तो तिलक वर्मा आणि त्यांची जोडी यावेळी चांगलीच जमली. विल जॅक्सने 36 धावांचे योगदान दिले. जॅक्स बाद झाल्यानंतर तिलक वर्माने नाबाद 21 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. हार्दिक पंड्या 21 धावा काढून माघारी परतला. मुंबईने विजयी लक्ष्य 18.1 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पार केले.
हैदराबादचे स्टार फेल
प्रारंभी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय योग्य ठरला. अभिषेक शर्मा व ट्रेव्हिस हेड जोडीला चौकार-षटकार मारण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. अभिषेकने (40) तरीही काही शॉट मारून संघाला वेगवान सुरुवात देण्याचा प्रयत्न केला पण हेड (28) संपूर्ण डावात संघर्ष करताना दिसला. नंतर हेनरिक क्लासेनने 37 धावांचे योगदान देत थोडा डाव सावरला आणि 18 व्या षटकात 21 धावा चोपल्या. त्यानंतर 20 व्या षटकात, हैदराबादने हार्दिक पांड्याच्या 3 षटकारांसह 22 धावा काढत 162 धावांचा टप्पा गाठला. अनिकेत वर्माने 8 चेंडूत 18 धावा फटकावल्या. अर्थात, वानखेडेच्या या खेळपट्टीवर हैदराबादचे स्टार फलंदाज सपपशेल फेल ठरल्याचे पहायला मिळाले.
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 5 बाद 162 (अभिषेक शर्मा 40, ट्रेव्हिस हेड 28, नितीश कुमार रे•ाr 19, क्लासेन 37, अनिकेत वर्मा नाबाद 18, कमिन्स नाबाद 8, विल जॅक्स दोन बळी, बोल्ट व बुमराह प्रत्येकी एक बळी) मुंबई इंडियन्स 18.1 षटकांत 6प् बाद 166 (रिकेल्टन 31, रोहित शर्मा 26, विल जॅक्स 36, सुर्यकुमार यादव 26, तिलक वर्मा नाबाद 21, हार्दिक पंड्या 21, पॅट कमिन्स 3 बळी तर इशान मलिंगा 2 बळी)










