जालंधर पोटनिवडणुकीची उमेदवारी शक्य
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमधील जालंधर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीपूर्वी भाजपचे पारडे जड दिसून येत आहे. इंदर इक्बाल यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, पंजाब प्रभारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी तसेच भाजप नेते तरुण चुग यांच्या उपस्थितीत इंदर सिंह इक्बाल यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
इंदर सिंह इक्बाल हे राज्यसभेचे माजी उपसभापती चरणजीत सिंह अटवाल यांचे पुत्र आहेत. जालंधर पश्चिम मतदारसंघातील माजी आमदार अन् काँग्रेस नेते सुशील रिंकू यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आम आदमी पक्षाने रिंकू यांना जालंधर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. अशा स्थितीत इंदर इक्बाल सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने त्यांनाच या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याचे मानले जात आहे. इंदर सिंह यांचे वडिल अकाली दलाचे नेते आहेत.
पंतप्रधान मोदींनी कर्तारपूर कॉरिडॉर सुरू करत ऐतिहासिक कार्य केले आहे. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याने आनंदी असल्याचे उद्गार इंदर सिंह यांनी काढले आहेत.









