सारस्वत चेंबरतर्फे कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
व्यवसाय सुरू केल्यानंतर तो वाढविण्यासाठी मार्केटिंगचे कौशल्य सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. आपण उत्पादित केलेले साहित्य ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचविण्याचे कौशल्य उद्योजकाकडे असल्यास तो उद्योग भरभराटीला येतो. मार्केटिंग करताना आसपासचा परिसर, त्या साहित्याची गुणवत्ता, ग्राहक या सर्वांचा विचार करूनच व्यवसायाची वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन डॉ. अमित रांगणेकर यांनी केले.
सारस्वत चेंबरच्यावतीने शनिवारी हॉटेल नेटिव्ह येथे ‘मार्केटिंग मास्टरक्लास ः मार्केटिंग फॉर रिझल्ट्स’ या विशयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विविध कंपन्यांचा आधार घेत मार्केटिंग कौशल्याची माहिती करून दिली. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय करणे अधिक सोयीचे झाले आहे. आज अनेक ऍप्लिकेशन उपलब्ध असून त्याद्वारे आपण आपला व्यवसाय वाढवू शकतो. पितांबरीसारखी एक कंपनी अवघ्या 50 हजाराच्या भांडवलामध्ये सुरू करण्यात आली होती. आज ही कंपनी वार्षिक 250 कोटी रुपयांचा व्यवसाय केवळ मार्केटिंगच्या जोरावर करत असल्याचे डॉ. रांगणेकर यांनी सांगितले.
त्यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मार्केटिंग कौशल्य कोणत्या मूल्यांवर आधारित असते याविषयी माहिती दिली. सध्या बाजारात सर्वोच्च स्थानावर असणारे बँड कशा पद्धतीने मार्केटिंग करतात याविषयी त्यांनी माहिती दिली. अमित पंडित यांनी सारस्वत चेंबरविषयी माहिती दिली. उद्योजक रोहित देशपांडे यांनी परिचय करून दिला. उद्योजक सचिन सबनीस यांनी डॉ. रांगणेकर यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला बेळगाव परिसरातील उद्योजक व सारस्वत समाजातील नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम सारस्वत बँकेने प्रायोजित केला होता.









