थंडीने चिकन, मटण व अंडय़ांना पसंती
प्रतिनिधी/ बेळगाव
मार्गशीर्ष अवघ्या चार दिवसांवर आल्याने मटण, चिकन, मासळी आणि अंडय़ांच्या मागणीत वाढ झाली आहे. येत्या गुरुवारपासून मार्गशीर्षला प्रारंभ होत आहे. मांसाहाराला मागणी वाढत आहे. मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः महिलावर्गाकडून मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे आता मांसाहाराला पसंती दिली जात आहे.
ग्रामीण भागात सुगी हंगामाला जोर आला आहे. दरम्यान मळणीच्या जेवणासाठी विशेषतः मांसाहाराला पसंती दिली जाते. त्यामुळे चिकन, मटण आणि अंडय़ांची मागणी वाढत आहे. मार्गशीर्ष थंडी आणि ग्रामीण भागातील मळणी हंगामामुळे मांसाहाराला मागणी वाढू लागली आहे. मार्गशीर्ष महिन्यात काही महिलांकडून दर गुरुवारी लक्ष्मीव्रत केले जाते. या काळात लक्ष्मीव्रत करणाऱया महिला मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे मार्गशीर्ष सुरू होण्याआधीच मांसाहाराचा बेत आखला जात आहे. त्यामुळे मागणी वाढत आहे.
लम्पीमुळे जनावरांचा बाजार बंद आहे. त्यामुळे बकरी बाजारावर देखील याचा परिणाम झाला आहे. मटणविपेत्यांना बकरी मिळणे अशक्मय झाले आहे. त्यामुळे मटणाचे दर देखील काही प्रमाणात वाढले आहेत. शहरात मटण 680 रुपये किलो तर चिकन 210 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. तर अंडय़ांचा दर शेकडा 530 रुपये झाला आहे. थंडी वाढल्यामुळे पाच रुपयाला मिळणारे अंडे 6 रुपये झाले आहे. थंडीने मांसाहाराची मागणी वाढली असली तरी मटण आणि अंडय़ांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे मांसाहार खवय्यांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
उदय घोडके (बेळगाव मटण असोसिएशनचे अध्यक्ष)
मटणाचे दर वाढल्याने खवय्यांनी पाठ फिरविली आहे. व्यापार मंदावला आहे. शिवाय बकरी बाजार बंद असल्याने बकरी मिळणे देखील कठीण झाले आहे. दरवषी थंडीच्या सिझनमध्ये मांसाहाची विक्री वाढत होती. मात्र यंदा त्या तुलनेत व्यापार थंडावला आहे.









