युएपीए अंतर्गत अनेक गुन्हे नोंद
वृत्तसंस्था/ पलक्कड
केरळ एटीएसने माओवादी सोमन याला पलक्कड येथून अटक केली आहे. सोमन विरोधात युएपीए अंतर्गत अनेक गुन्हे नोंद आहेत. सोमन याची एर्नाकुमल येथे चौकशी केली जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी रविवारी दिली आहे.
सोमन हा प्रतिबंधित भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)च्या पश्चिम घाट विशेष क्षेत्र समिती कबानी दलमचा नेता आहे. यापूर्वी वरिष्ठ माओवादी नेता मनोज सोमनला कोची येथून अटक करण्यात आली होती. मनोज सोमनच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच सोमनला अटक करण्यात आली आहे. सोमन हा केरळच्या वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टाचा रहिवासी आहे.
सोमन हा 2011 पासून माओवादी कारवायांमध्ये सामील राहिला आहे. तसेच माओवादी समुहांच्या कबानी दलम आणि नादुकनी दलमचा तो हिस्सा राहिला आहे. माओवादी समूह केरळच्या अनेक भागांमध्ये सक्रीय आहेत. यापूर्वी 2016 मध्ये केरळमध्ये एका चकमकीत 8 माओवादी मारले गेले होते.









