खानापूर जनता दर्शन कार्यक्रमात समस्या नोंदणीसाठी दहा काऊंटर : सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
खानापूर / नंदगड
शासनाने सामान्य जनतेच्या समस्याचे निराकारण करण्यासाठी तालुक्यापासून राज्यापर्यंत जनता दर्शन कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या समस्या, अडचणी दूर होण्यासाठी मदत होणार आहे. शासनाच्या या उपक्रमाचे मी मनापासून अभिनंदन करतो. या उपक्रमाचा सामान्य जनतेने आपल्या शासकीय अडचणी दूर करण्यासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन जनता दर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना केले.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, शासनाच्या या उपक्रमाचा लाभ सामान्य जनतेसाठी व्हावा, या उद्देशाने तालुक्याच्या ठिकाणी सर्व जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकारी एकत्र येऊन समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपण अधिकृत नमूद करून तक्रार नेंदवल्यास आपली तक्रार मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवणार आहे. त्यामुळे त्याचे निराकरण होईपर्यंत आम्हाला गत्यंत्तर नाही. यासाठी काऊंटरवर नमूद करूनच आपण तक्रार करावी, असे आवाहन केले.
नंदगड येथील जनता दर्शन कार्यक्रमात सार्वजनिकासह वैयक्तिक समस्या मार्गी लावण्यासाठी अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्या. यासाठी दहा काऊंटर ठेवले होते. दिवसभर हा जनता दर्शन कार्यक्रम चालला. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, जि. पं. चे कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा अतिरिक्त पोलीस प्रमुख वेणू गोपाल, नंदगड ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, उपाध्यक्षा संगीता म•ाrमणी, उपविभागीय अधिकारी श्र्रवण नाईक, विजय कुमार हुलकेरी, शंकर कल्लोळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी, विविध खात्यांचे जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार विठ्ठल हलगेकर व माजी आमदार अरविंद पाटील यांनी संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात जनता दर्शन कार्यक्रम झाला.
रेल्वे मार्गासाठी जमीन देण्यास शेतकरी तयार
नंदगड-बिडी भागातील जनतेने खानापूर-नंदगड-बिडी-कित्तूर, धारवाड असा रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी या भागातील जनता जमीन देण्यास तयार आहे.
शेतकऱ्यांसाठीची भरपाई रक्कम दुप्पट
जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम दुप्पट केली असल्याचे जिल्हा वनाधिकाऱ्यानी सांगितले. कक्केरी येथील सरकारी दवाखान्यात तीस खाटांची व्यवस्था करावी. लिंगनमठ, चुंचवाड व गोधोळी गावांसाठी चक्करलाईन रस्त्यासाठी सर्वे करावा अशी मागणी केली. हेब्बाळ येथील जलसिंचन योजनेचे पाणी पुरवठा करणारे दोन्ही दरवाजाच्या दुऊस्तीची मागणी केली. नंदगड समुदाय आरोग्य केंद्रातील डॉक्टर व नर्सबाबतही तक्रार केली. लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी एमबीबीएस डॉक्टरांची सोय करा. तक्रारी व निवेदन देण्यासाठी खानापूर तालुक्मयाच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते. खानापूर तालुका भूविकास बँकेच्या संचालक मंडळाने चेअरमन मुरलीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बँकेसाठी मंजूर केलेल्या जागेवर अतिक्रमण करून दुकान गाळे निर्माण करण्यात आल्याने बँकेला मंजूर करण्यात आलेली जागा हडप केल्याची लेखी तक्रार केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना अहवाल देण्याची सूचना केली आहे.
कार्यालयात मराठीच्या वापराबाबत समितीकडून निवेदन
तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष निरंजन देसाई यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या शिष्टमंडळाने शासकीय कार्यालयात कन्नडबरोबर मराठीलाही प्राधान्य देण्याच्या मागणीचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य क्रम घेण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात मऱ्याप्पा पाटील, रमेश धबालेसह इतर समिती कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ढिसाळ नियोजन
जनता दर्शन कार्यक्रमातील नियोजन ढिसाळ झाले होते. नंदगड येथील कै. बसापण्णा अरगांवी सभामंडपात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र नियोजनाअभावी समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना गोंधळ उडाला. सभामंडपातच तक्रारी स्वीकारण्याचे टेबल लावल्याने तक्रार देण्यासाठी दहा ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती. अधिकारी कोण आणि तक्रारदार कोण समजत नव्हते. बेळगाव येथून जिल्हास्तरीय 60 तर खानापूर तालुकास्तरीय दीडशे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तक्रारीचे निवेदन स्वीकारत होते. तक्रारीचे निरसन करण्यासाठी वेळ जात होता. काहीवेळा जिल्हाधिकारी आपणच याबाबत निर्णय घेऊ, असे सांगून तक्रारदाराचे समाधान करत होते. कार्यक्रमात समस्यांचा निराकरण झालेले नसल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दुपारनतर काही लोकानी तक्रार न देताच परतावे लागले. त्यामुळे दुपारी 3 नंतर तक्रारदारांची गर्दी कमी झाली.
महसूल अन् नगरपंचायत अधिकाऱ्यांना धारेवर
खानापूर शहरात असलेल्या सरकारी तलावात अतिक्रमण करून घरकुल योजना राबविली आहे. याबाबत खानापूरचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिरजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यासकट माहिती देऊन तलाव हटवून या ठिकाणी घरकुल योजना राबवली आहे. अशी तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल आणि नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. संबंधित जागा तातडीने ताब्यात घेऊन तारेचे कुंपण करण्याची सूचना केली आहे.









