वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्राच्या महिलांना 71 व्या राष्ट्रीय कब•ाr स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीतच हरियाणाकडून पराभव पत्करावा लागला. हरियाणा, मोरमाजरा, कर्नाल येथील आर्य कन्या गुरुकुलच्या मैदानात मॅटवर झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात हरियाणाने महाराष्ट्राला 40-26 असे पराभूत केले. फ गटात विजयी झाल्यास उपउपांत्यपूर्व फेरीत रेल्वेशी पंगा घ्यावा लागेल म्हणून हरियाणाने शेवटच्या साखळी सामन्यात गोव्याकडून पराभव पत्करला. त्याने ज्या उद्देशाने आपले डावपेच आखले त्याप्रमाणे खेळ करीत महाराष्ट्रावर मात केली. विश्रांतीला 23-11 अशी आघाडी घेत हरियाणाने सुरुवातीपासून महाराष्ट्रावर वर्चस्व ठेवले. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत आरामात सामना आपल्या नावे केला. महाराष्ट्राच्या आम्रपाली गलांडे, मंदिरा कोमकर यांची या सामन्यात मात्रा चालली नाही. उत्तरार्धात संधी मिळालेल्या तसलीम बुरोंडकर, माधुरी गवंडी यांनी थोडी फार चमक दाखविली. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती.









