बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक 16 वर्षाखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने ठळकवाडीचा 6 गड्यांनी पराभव करून हनुमान चषक पटकाविला. सिध्दार्थ मेणसेला ‘सामनावीर’ तर हर्ष नाशिपुडीला ‘मालिकावीर’ पुरस्काने गौरविण्यात आले. अंतिम सामन्यात ठळकवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 77 धावा केल्या. त्यात प्रज्योत उघाडे व वेदांत पोटे यांनी प्रत्येकी 2 चौकारांसह 15 धावा, श्रीहरी जाधवने 13 तर नागेश्वर बेनकेने 12 धावा केल्या. हेरवाडकरतर्फे सिद्धार्थ मेणसेने 3 धावांत 3, लक्ष्य खतायतने 5 धावांत 3, मंथन माईनकरने 14 धावांत 2 तर आदित्य जाधवने 1 गडी बाद केला. प्रत्युतरादाखल खेळताना हेरवाडकरने 12.5 षटकात 4 गडी बाद 81 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात हर्ष नाशिपुडीने 5 चौकारांसह 36, लक्ष्य खतायतने 5 चौकारांसह 24 तर आदित्य जाधवने 2 चौकारांसह 14 धावा केल्या.
ठळकवाडीतर्फे प्रज्योत उघाडेने 17 धावांत 4 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते आनंद सोमनाचे, एसकेई सोसायटीचे स्पोर्ट्स कमिटीचे अध्यक्ष आनंद सराफ, बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, शिरीष गोगटे, प्रकाश मिरजी, हेरवाडकरच्या मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या हेरवाडकर व उपविजेत्या ठळकवाडी संघाला चषक, पदके व प्रमाणपत्रे देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर सिद्धार्थ मेणसे, उत्कृष्ठ फलंदाज सुरेंद्र पाटील-केएलएस, उकृष्ठ गोलंदाज सिद्धार्थ रायकर-केएलएस, उगवता खेळाडू प्रज्योत उघाडे, उगवता संघ लिटल स्कॉलर व बिरला इंटरनॅशनल, तर मालिकावीर हर्ष नाशिपुडी-हेरवाडकर यांना चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून तेजस पवार, जोतिबा पवार, सोमनाथ सोमनाचे, प्रभाकर कंग्राळकर तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे यांनी काम पाहिले.










