628 जनावरे बाधित, शेतकऱ्यांत भीती, खबरदारीची गरज
बेळगाव : जीवघेण्या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा हळुहळू वाढू लागला आहे. त्यामुळे पशुपालकांना धास्ती निर्माण झाली आहे. सप्टेंबर अखेरीस 500 पर्यंत असणारी बाधित जनावरांची संख्या 628 वर पोहोचली आहे. त्यामुळे लम्पी पुन्हा जिल्ह्यात पाय पसरताना दिसत आहे. त्यामुळे पशुसंगोपनचीदेखील डोकेदुखी वाढली आहे. रब्बी हंगाम तोंडावर आला आहे. त्यातच गोवर्गीय जनावरांना लम्पीची लागण होत असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागली आहे. जिल्ह्यात 5 लाख 45 हजार 940 इतकी गोवर्गीय जनावरांची संख्या आहे. त्यापैकी 179 गावातील 628 जनावरे बाधित झाली आहेत. तर समाधानकारक बाब म्हणजे 461 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. तर सद्यस्थितीत 167 जनावरांवर उपचार सुरू आहेत. खबरदारी म्हणून 5 लाख 27 हजार 137 जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या आदींचा समावेश आहे. यापैकी गाय, बैल आणि वासरांना लम्पीची लागण होवू लागली आहे. गतवर्षी 30 हजारांहून अधिक जनावरे या रोगापासून दगावली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पुन्हा यंदा या रोगाचा प्रादुर्भाव हळुहळू वाढू लागला आहे. गोचीड, चिलट्या, माशा आदींपासून या रोगाची लागण होते. बाधित जनावरे निरोगी जनावराच्या संपर्कात आल्यास संसर्ग वाढतो. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने जनावरांचे आठवडी बाजार बंद ठेवले आहेत. मात्र सीमाहद्दीवरील तालुक्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे. हुक्केरी, निपाणी, कागवाड, अथणी, चिकोडी, बेळगाव आदी तालुक्यांमध्ये बाधित जनावरे आढळून येत आहेत. समाधानकारक बाब म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदा प्रादुर्भावाचे प्रमाण कमी आहे. शिवाय मरतुकीचे प्रमाण देखील कमी आहे. गतवर्षी ऑगस्ट दरम्यान या रोगाचा शिरकाव झाला होता. त्यानंतर सर्वत्र प्रसार होवून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. काही पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी मोठा खर्च करावा लागला होता. त्यामुळे यंदा पशुपालकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.









