वार्ताहर /सांबरा
गोकुळनगर मुतगे येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अलीकडेच गावोगावी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. त्यावेळी मुतगे ग्रामपंचायतीला हा कचरा दिसला नाही का, असा प्रश्न सध्या स्थानिक लोकांना पडला आहे. ग्रामपंचायतीने ज्या ठिकाणी कचरा नाही अशा ठिकाणी स्वच्छता केल्याचे भासवून फोटो सेशन केले होते. मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी स्वच्छतेची गरज आहे अशा ठिकाणी स्वच्छता केली असती तर लोकांची गैरसोय तरी दूर झाली असती, अशीही चर्चा सध्या गावात सुरू आहे. ग्रामपंचायतीकडून कचऱ्याची उचल वेळेवर होत नसल्याने कचऱ्याचे ढीग वारंवार पहावयास मिळत आहेत. त्यामुळे स्वच्छतेसाठी असलेला ग्रामपंचायतीचा निधी कुठे जात आहे, असाही प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. तसेच याच रस्त्यावरून अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींचेही येणे जाणे असते. मात्र त्यांनीही याकडे कानाडोळा केल्याने स्थानिक लोकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बरेच दिवस कचरा साचून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीचे रोग होण्याची शक्यता आहे.









