सैन्य न्यायालयाने अधिकाऱयाला ठरविले दोषी ः 3 जणांचा झाला होता मृत्यू
वृत्तसंस्था / श्रीनगर
भारतीय सैन्याच्या न्यायालयाने सोमवारी काश्मीरच्या अमशीपोरा येथे झालेल्या बनावट चकमकीप्रकरणी एका कॅप्टनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची शिफारस केली आहे. या शिक्षेसंबंधी सैन्याचे उच्चाधिकारी निर्णय घेणार आहेत. ही चकमक जुलै 2020 मध्ये दक्षिण काश्मीरच्या अमशीपोरा येथे झाली होती आणि यात 3 जणांचा मृत्यू झाला होता.
सैन्याच्या न्यायालयाने वर्षभरापेक्षा कमी काळात ‘कोर्ट मार्शल’ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. सैनिकांनी सशस्त्र दल विशेषाधिकार अधिनियम (अफ्स्पा)चे उल्लंघन केले होते असे सुनावणीदरम्यान आढळून आले होते. यानंतर संबंधित अधिकाऱयाचे कोर्ट मार्शल करण्यात आले होते.
18 जुलै 2020 रोजी दक्षिण काश्मीरच्या शोपियांमधील अमशीपोरामध्ये चकमकीत 3 जण मारले गेले होते. मारले गेलेले तिन्ही इसम दहशतवादी होते असा दावा सैन्यपथकाने केला होता. तर इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इबरार अशी मृतांची नावे होती. या चकमकीला बनावट संबोधत अनेकांनी निदर्शन केली होती. यानंतर सैन्याने ‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ स्थापन केली होती. याच्या प्रारंभिक तपासात अफ्स्पा अंतर्गत प्राप्त अधिकारांचे उल्लंघन करण्यात आल्याचे आढळून आले होते. यानंतर न्यायालयाने संबंधित कॅप्टनला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याची शिफारस केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. न्यायालयाचा निर्णय स्वागतयोग्य आहे. अशाप्रकारच्या घटना रोखण्यासाठी लावापोरा आणि हैदरपोरा चकमकींप्रकरणीही निष्पक्ष चौकशीचा आदेश दिला जाईल अशी अपेक्षा असल्याचे मुफ्ती यांनी म्हटले आहे.









