पूर्ण बहुमत नाही, तरी परत मार्क कर्नीच होणार नेते
वृत्तसंस्था / ओटावा
कॅनडामध्ये संसदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा सत्ताधारी लिबरल पक्षाला जनतेचा कौल मिळाला आहे. एकंदर, 345 जागांपैकी या पक्षाला 168 जागा मिळून तो बहुमताच्या जवळ पोहचला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला 144 जागा मिळाल्या आहेत. ब्लॉक क्वेबेकॉईस या पक्षाला 23 जागा आहेत, तर अन्य आणि अपक्ष उमेदवारांना एक जागा मिळाली आहे.
या निवडणुकीत शीख फुटीरतावाद्यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्यू डेमॉक्रेटिक पक्षाला केवळ सात जागा मिळाल्या आहेत. या पक्षाचे नेते आणि भारत विरोधी म्हणून ओळखले जाणारे जगमिंदर सिंग स्वत: पराभूत झाले आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी अशी मागणी केली होती. त्यांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा बऱ्याच कमी म्हणजे केवळ 7 जागा मिळाल्यामुळे या पक्षाला आता कॅनडाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका साकारता येणार नाही. तसेच किमान 12 जागा न मिळवता आल्याने एनडीपी पक्षाची अधिकृत राजकीय पक्ष म्हणून असणारी मान्यताही आता जाणार आहे. जगमिंदर सिंग यांनी पक्षाच्या प्रमुखपदाचा त्याग केला असून पराभव स्वीकारला आहे. अशाप्रकारे सलग चौथ्या वेळेला कॅनडात लिबरल पक्षाचे सरकार स्थापन होणार आहे. या निवडणुकीत प्रथमपासूनच या पक्षाची अवस्था योग्य नव्हती. मात्र, या पक्षाला अनपेक्षित विजय मिळाला आहे.
भारतावर परिणाम काय होणार…
कर्नी यांच्यापूर्वी कॅनडाचे नेते जस्टीन ट्रूडो हे होते. त्यांच्या काळात भारताच्या आणि कॅनडाच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. हरदीपसिंग निज्जर या खलिस्तानवाद्याच्या हत्येत भारत सरकारचा हात आहे, असा आरोप त्यांनी कोणताही पुरावा नसताना केला होता. त्यामुळे भारताने त्यांच्यावर कठोर टीका केली होती. मात्र, कर्नी यांच्याकडे कॅनडाची सूत्रे आल्यापासून त्यांनी भारताशी संबंध सुधारण्याची भाषा केली आहे. भारताशी घनिष्ट संबंध हा कॅनडाच्या धोरणाचा प्रमुख भाग आहे, असे त्यांनी विजयी झाल्यानंतरही स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून अभिनंदन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे नेते मार्क कर्नी यांचे विजयासाठी अभिनंदन केले आहे. लोकशाहीवर आस्था हा भारत आणि कॅनडातील समान धागा आहे. आम्हाला कॅनडाशी घनिष्ट द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करायचे आहेत, अशी भूमिका त्यांनी अभिनंदनाच्या संदेशात स्पष्ट केल्याची माहिती आहे.









