वृत्तसंस्था / बँकॉक
या वर्षअखेरीस होणाऱ्या आशिया चषक महिलांच्या बेसबॉल स्पर्धेसाठी भारतीय महिला बेसबॉल संघाने आपली पात्रता सिद्ध केली आहे. येथे सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.
पात्र फेरीच्या स्पर्धेतील सामन्यात भारताने थायलंडचा 6-5 असा पराभव करत सुपर राऊंड स्टेज गुणतक्त्यात दुसरे स्थान मिळविले आहे. इंडोनेशिया पहिल्या स्थानावर आहे. आता या पात्र फेरीच्या सुपर राऊंड फेरीत पहिले दोन संघ चालु वर्षाअखेर होणाऱ्या आशिया चषक बेसबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. इंडोनेशिया आणि भारत यांच्यात आता सुवर्णपदकासाठी लढत होणार आहे. त्याचप्रमाणे थायलंड आणि पाकिस्तान यांच्यात कांस्यपदकासाठी सामना होईल. पात्र फेरीच्या महिलांच्या बेसबॉल स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश असून अ गटात भारताने आपले सर्व म्हणजे तीन सामने जिंकताना पाकिस्तान, श्रीलंका आणि इराण यांचा पराभव केला. ब गटात इंडोनेशिया आघाडीवर आहे. 2023 साली झालेल्या आशिया चषक बेसबॉल स्पर्धेत भारताने आपला सहभाग दर्शविला होता. पण त्यांना सलामीची फेरी पार करता आली नव्हती.









