सुट्टीच्या काळात कोणते चित्रपट बघावेत, कसे बघावेत याबद्दल यापूर्वीच्या लेखामधील उदाहरणे वाचून तसे चित्रपट बघायला सुरुवात केली असेल, अशी आशा आहे. ‘तारे जमीन पर’ चित्रपटातील ‘मेरा जहां’ गाण्याची सुरुवात होते त्यावेळी शाळेच्या वर्गामधून बाहेर पडणारा ईशान आपल्याला दिसतो. वर्गाच्या बाहेर अनेक खिडक्यांमधून पडणारा प्रकाश पायाखाली घेता घेता ईशान पायऱया उतरण्यास सुरुवात करतो त्यावेळी आपल्याला त्याच्या नजरेतून पायऱया दिसतात. पायऱया उतरताना शाळेच्या बाहेरच्या रस्त्यावरून पळणारी वाहने खिडकीमधून दिसतात. शाळेच्या दारामधून दिसणारा ईशान शाळेचे मोठे फाटक ओलांडताना दिसतो. रस्त्यावरून चालता चालता ईशानच्या नजरेतून आपण ‘बुढ्ढी के बाल’ तयार करताना बघतो, वेगवेगळे स्टॉल बघतो. त्यावेळी कॅमेरा लहान मुलाच्या उंचीवर ठेवलेला आहे आणि त्यामधून निरागसपणे आपण सगळ्य़ाचा आनंद लुटतो. मुले ज्याप्रमाणे इकडे तिकडे न बघता बिनधास्त रस्ता ओलांडतात ते दृश्य बघतो. उंच इमारतीवर रंग देणारा माणूस कसा एकेक मजला वर चढतो ते आपण अचंबित होऊन बघतो. त्याचवेळी रंगारीच्या डब्यातल्या रंगाचा थेंब वरून पडतो त्यावेळी आपण त्या थेंबाबरोबर प्रवास करतो आणि तो थेंब ईशानच्या गालावर कसा पडतो ते बघतो. बर्फाचा गोळा कसा करतात हे बघता बघता ईशानबरोबर आपलेही भान हरपते. हीच ती कॅमेऱयाची कमाल आहे.
याच चित्रपटातील ‘जमे रहो’ गाणे बघताना शिस्तबद्ध पद्धतीने जागे होणारा मुलगा आपल्याला दिसतो, तो गडबडीत सगळे व्यवस्थित आवरतो आणि शाळेत जातो त्यावेळी गाण्याला एक लय आहे. तो शाळेसाठी घरामधून बाहेर पडल्यानंतर ईशानकडे कॅमेरा वळतो आणि उशिरा उठणारा हा मुलगा बघताना गाण्याची लय लगेच बदलते आणि संथ होते. ‘खोलो खोलो दरवाजे’ गाणे फक्त गिटारच्या ठेक्यावर आहे. चित्रपटातील गाणी ऐकताना या पद्धतीने गाण्यातील वाद्ये ओळखण्याचा प्रयत्न करावा. आता गाण्यांचे ‘मेकिंग’ असणारे व्हिडियो सहजगत्या बघावयास मिळतात. त्यामधून आपल्याला गाण्याच्या रेकॉर्डिंगचे जग बघायला मिळते, वाद्ये बघता येतात. प्रत्येक वाद्याचा आवाज वेगळा असतो, ते वाद्य वाजवण्याचा बाज वेगळा असतो. संगीताचा ‘नाद’ लागण्यासाठी अशाप्रकारे जुनी-नवी, हिंदी-मराठी-हिंदुस्थानी-पाश्चात्य अशा अनेक भाषा-शैलीमधील गाणी रोज एक तास गाणी ऐकावीत. पालकांनी पाल्याच्या लहानपणापासून सर्व प्रकारचे संगीत ऐकण्यासाठी कान तयार करावे. आज संतूर, उद्या सारंगी, त्यानंतर गिटार, व्हायोलीन, हार्मोनियम, कीबोर्ड अशी अनेक वाद्ये ऐकण्याचे वेळापत्रक तयार करावे. लहानपणापासून अशी गाणी ऐकल्यानंतर पुढे कधी पाचवी-सहावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीला एखादे वाद्य शिकण्याची इच्छा होऊ शकते. ‘आम्हाला हार्मोनियम-तबला शिकण्याची इच्छा होती परंतु ती पूर्ण करता आली नाही’ या कारणास्तव आई-वडिलांनी आपल्या पाल्याचे नाव कोणत्यातरी क्लासमध्ये नोंदवू नये. सुट्टीमध्ये कोणतातरी क्लास लावल्यामुळे संगीताचा नाद लागणार नाही. त्यासाठी पालकांनी संगीत ऐकण्याचा रियाज पाल्याचा बाल्यावस्थेत त्या बालकासह करावा. ज्या घरामध्ये संगीत नियमितपणे ऐकले जाते, त्याच घरातल्या मुला-मुलीना संगीत शिकण्याची आवड निर्माण होऊ शकते. अलीकडेच एका पालकांचा फोन आला आणि मला म्हणाले ‘माझ्या मुलीला व्हायोलीन शिकायला पाठवायचे आहे, एखाद्या चांगल्या क्लासचे नाव सांगा.’ मी त्यांना मुलीच्या संगीत आवडीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, ‘क्लास लावल्यावर आवड निर्माण होईल, आता ती काहीही ऐकत असते.’ अर्थात ‘काहीही’ म्हणजे नेमके काय हे त्या पालकांना सांगता आले नाही. त्यानंतर त्यांना मी सांगितले की सुरुवातीलाच व्हायोलीन शिकण्यापेक्षा हार्मोनियम-कीबोर्ड शिकावा, रोज एक तास वेगवेगळे संगीत ऐकावे आणि साधारणतः वर्षभर सातत्य राखले तर व्हायोलीन-सारंगी-सरोद अशी वाद्ये शिकण्याचा प्रयत्न करावा कारण या वाद्यांमध्ये ठराविक स्वरस्थाने नसतात. माझे हे उत्तर पालकांना पटले नाही कारण त्यांना त्यांच्या मुलीला सुट्टीत व्हायोलीन शिकवायची इच्छा होती.
कोणतीही कला एक-दोन महिन्यात शिकता येत नाही. सुट्टीच्या काळात कलेची आवड निर्माण होऊ शकते. चित्रकलेची आवड निर्माण व्हावी यासाठी चित्रे काढण्याची सवय नसणाऱया विद्यार्थ्याचे थेट ‘वॉटर कलर’ च्या क्लासला नाव नोंदवणे गैर आहे. सरळ रेषा, वर्तुळ, रेखाचित्रे, चित्रे रंगवणे असा प्रवास करता करता ‘वॉटर कलर’ कडे वळता येईल. पुंडलिक वझे, चारुहास पंडित (चिंटू) यांच्या पुस्तकातील रेखाचित्रे काढण्याची सवय झाल्यानंतर निसर्ग चित्रे रेखाटण्याचा प्रयत्न करावा. दोन डोंगर, त्यामधून उगवणारा सूर्य, डोंगरामधून उतरणारी नदी आणि त्याबाजूला एक टुमदार घर असे निसर्गचित्र किती वर्षे काढणार? त्याऐवजी मुलांना स्वतःच्या कल्पनेतले चित्र रेखाटण्याचे स्वातंत्र्य द्यावे. हत्ती असो वा शाळेची इमारत नेहेमीच एका ठराविक बाजूने चितारली जाते. त्याऐवजी एकदा हत्ती पाचव्या मजल्यावरून कसा दिसतो ते चित्र काढण्याचा प्रयत्न करावा, आपली शाळा हेलिकॉप्टरमधून कशी दिसेल याचा अंदाज बांधून चित्र काढावे. त्याचा रियाज झाल्यानंतर मिलिंद मुळीक यांची ‘वॉटर कलर’ या विषयावरची पुस्तके वाचावी. जवळपासच्या आर्ट गॅलरीमध्ये चित्र प्रदर्शन बघण्यास पालकांनी मुला-मुलींना घेऊन जावे. त्यानंतर कोणत्या क्लासला नाव नोंदवावे हे बालक-पालक-चित्रकार यांनी चर्चेमधून ठरवावे.
‘नच बलिये’, ‘डान्स इंडिया डान्स’ सारखे रियालिटी शोज बघून नृत्याच्या क्लासला नाव नोंदवू नये. नृत्याचे भारतीय, पाश्चात्य प्रकार कोणते, ते सादर करणारे कलाकार कोणते, त्यामधील फरक काय याचा अभ्यास करण्यास सुरुवात करावी, वेगवेगळ्य़ा शैलीच्या नृत्याचे कार्यक्रम पालकांनी पाल्यासह सभागृहात हजेरी लावून बघावेत. ताल-लय याचा विचार करून वेगवेगळ्य़ा प्रकारची गाणी ऐकावी आणि त्यानंतर कोणत्या शैलीचे नृत्य शिकणार यावर एखाद्या नृत्य गुरूबरोबर विचार विनिमय करावा. ‘माधुरी दीक्षितसारखा नाच करता आला पाहिजे’ अशी मागणी करणाऱया पालकांनी या विषयाचा मुळापासून अभ्यास करण्यास सुरुवात करणे गरजेचे आहे, कारण माधुरी दीक्षितने कथ्थक नृत्य कसे शिकले याची माहिती न घेता आपल्या अपेक्षांचे ओझे मुला-मुलीवर लादणारे पालक आपल्या पाल्याला चुकीचा मार्ग दाखवतात.
कोणतीही कला शिकायची असेल तर अभ्यास आवश्यक आहे. कलेची आवड निर्माण करण्यासाठी सुट्टीचा उपयोग करता येईल. परंतु सुट्टीत गिटारच्या क्लासला नाव घालायचे आणि शाळा सुरु होताच ‘तो क्लास बंद कर आणि अभ्यास करायला सुरुवात कर’ असा आदेश देणाऱया घरात मुलांची गिटार कायमच खुंटीला टांगून राहते. आपल्या पाल्यांना संगीत-चित्रपट-नाटय़कला-नृत्य-चित्रकला अशा वेगवेगळ्या कलांची आणि त्यामधील उपप्रकारांची ओळख करून देणे पालकांचे काम हे आहे. त्यामधून कोणत्या कलेची आवड जोपासावी हा निर्णय पाल्याने घ्यावा.
-सुहास किर्लोस्कर








