महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
कदंब परिवहन महामंडळाच्या (केटीसीएल) सर्व डिझेलच्या जुन्या बसगाडय़ा भंगारात काढून त्यांच्या जागी नवीन ई-बसगाडय़ा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गेल्या आठवडय़ात कदंबच्या काही गाडय़ा विविध कारणांनी वाटेवरच बंद पडल्या आणि त्याचा फटका प्रवाशांना बसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे नवे अध्यक्ष तथा आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली आहे.
कदंब बसगाडय़ांबाबत जे प्रकार अलिकडे घडले त्याचे खापर अध्यक्षांनी महामंडळाच्या कामगारवर्गावर फोडले असून त्याचाच परिणाम म्हणून बसेस बंद पडण्याच्या घटना घडल्याचा दावा तुयेकर यांनी केला आहे.
दरम्यान, कदंब महामंडळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या बसगाडय़ा मोडीत काढल्यास महामंडळास सुमारे 1200 ई-बसगाडय़ांची गरज भासणार आहे तेव्हा सर्व जुन्या डिझेल बसगाडय़ा एकाच वेळी बंद करणे किंवा भंगारात काढणे शक्य नाही. प्रथम ई-बसगाडय़ा ताफ्यात आणाव्या लागतील आणि नंतरच डिझेल बसगाडय़ा ताफ्यातून कमी कराव्या लागतील, असे सांगण्यात आले.
प्रवाशांना ई-बसचा प्रवास सुखकारक
सध्या महामंडळाच्या ताफ्यात 50 ई-बसगाडय़ा असून त्या गोव्यातील विविध तसेच काही आंतरराज्य मार्गावर चालवण्यात येतात. आणखी 100 ई-बसगाडय़ांसाठी बांधकामाचे आदेश देण्यात आले असून त्या टप्याटप्याने डिसेंबर 2022 पासून महामंडळात सामील होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ई-बसगाडय़ांवर प्रवासीवर्ग समाधानी असून त्यांच्यामुळे प्रदूषण होत नाही व त्यांना डिझेलही लागत नाही, जास्त आवाजही करीत नसल्याने प्रवाशांना ई-बसचा प्रवास सुखकारक असल्याचा अनुभव आहे.









