दोन महिन्यांत 4 चित्त्यांनी घेतला अखेरचा श्वास
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशच्या कूनो नॅशनल पार्कमध्ये मंगळवारी चित्त्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला आहे. येथे दोन महिन्यांमध्ये आतापर्यंत 4 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. कूनोमध्ये मादी चित्ता ज्वालाने 27 मार्च रोजी 4 पिल्लांना जन्म दिला होता. यातील एका पिल्लाचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. प्रमुख वन संरक्षक जे.एस. चौहान यांनी पिल्लाच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. याचबरोबर कूनोमधील चित्त्यांची संख्या आता 23 झाली आहे. पिल्लांच्या जन्मापूर्वीच मादी चित्ता साशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उदय अन् दक्षा नावाच्या चित्त्यांचा मृत्यू झाला होता. पहिल्या खेपमध्ये नामीबियामधून 8 चित्त्यांना कूनो नॅशनल पार्कमध्ये आणले गेले होते. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे चित्ते कूनो नॅशनल पार्कमध्ये सोडले होते. यानंतर 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणले गेले होते.









