उचगाव/ वार्ताहर
विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत ग्रामीण मतदार संघातील उमेदवार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी विजय संपादन केल्यानंतर उचगावला धावती भेट देऊन मतदारांचे आभार मानले. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचा विजय निश्चित झाल्यानंतर उचगाव आणि परिसरात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण सर्वत्र दिसून येत होते. लक्ष्मीताई हेब्बाळकर या उचगावला शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमाराला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येताच जोरदार घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण यावेळी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लागलीच त्यांनी उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच संपूर्ण उचगावमध्ये कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. यावेळी प्रामुख्याने बुडाचे माजी अध्यक्ष व एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, ग्रा. पं. अध्यक्ष जावेद जमादार, उपाध्यक्ष मथुरा बाळकृष्ण तेरसे यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनगरी ढोल, ताशाच्या निनादात यावेळी गावातून भव्य मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी या मिरवणुकीमध्ये महिला, पुरुष, युवक युवती यांचा सहभाग दिसून येत होता. तसेच या भागातील अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, कोणेवाडी, तुरमुरी, सुळगा, कल्लेहोळ, बेनकनहळ्ळी या सर्व गावांमधून विजयोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत होते.









