यात्रेला पहिल्या दिवसापासून भाविकांची गर्दी : मंडपाला तिरुपती बालाजी मंदिराचे स्वरूप
वार्ताहर /नंदगड
करंबळ येथील लक्ष्मी देवीची मूर्ती बुधवारी रात्री 10 वा. गदगेवर स्थानापन करण्यात आली. देवीच्या यात्रेला पहिल्या दिवसापासून भाविकांची गर्दी होत आहे. गुरुवारी सकाळपासून देवीच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. सायकांळी 5 ते रात्री 10 वा. पर्यंत गदगा परिसरात भाविक मोठ्या प्रमाणात होते. तिरुपती बालाजी मंदिराचे स्वरूप गदगेवरील मंडपाला देण्यात आले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या माळांनी सजवण्यात आले आहे. गदगेवरील लक्ष्मी देवीची मूर्ती स्पष्टपणे दिसावी यासाठी मोठ्या दिव्यांची सोय करण्यात आली आहे. सर्वांना सुव्यवस्थितरित्या दर्शन घेता यावे, यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मुख्य मंडपाच्या समोर काही अंतरावर रात्र जागरणसाठी,मनोरंजनाचे कार्यक्रम करण्यासाठी मंडप घालण्यात आला आहे. त्याला लागून प्राथमिक उपचारासाठी आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपाच्या उजव्या बाजूला मिठाईची दुकाने लावण्यात आली आहेत. तर डाव्या बाजूला अन्य दुकाने व पाळणे ठेवण्यात आले आहेत. करंबळसह पाच गावांची ही यात्रा असल्याने त्या गावातील सर्व नागरिक व त्यांचे पै पाहूणे तसेच अन्य भाविक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. गावच्या वेशीलगत वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तर अन्य खुल्या जागेत वाहने लावली जात आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस व स्वयंसेवक कार्यरत आहेत. प्रत्येक घरासमोर व पाठीमागे तसेच स्लॅबवर पै- पाहुण्यांना राहण्यासाठी व त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मंडप घालण्यात आले आहेत. प्रत्येकानी आपल्या घराला रंगरंगोटी व विद्युत दिवे लावण्यात आल्याने सर्वत्र झगमगाठ पसरला आहे. करंबळसह अन्य पाच गावे ही सजली आहेत.









