वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओसने पुरुष एकेरीचे तर रशियाची सॅमसोनोव्हाने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
रविवारी येथे झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या 27 वर्षीय किर्गीओसने जपानच्या निशिओकाचा 6-4, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजेतेपद पटकाविले. किर्गीओसचे एटीपी टूरवरील हे सातवे तर गेल्या तीन वर्षांच्या कालावधीतील पहिले विजेतेपद आहे. या अंतिम सामन्यात किर्गीओसने 12 बिनतोड सर्व्हिसची नोंद करुन निशिओकाचा 81 मिनिटात पराभव केला.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रशियाच्या लूडमिला सॅमसोनोव्हाने इस्टोनियाच्या कॅनेपीचा 4-6, 6-3, 6-3 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. डब्ल्यूटीए टूरवरील सॅमसोनोव्हाचे हे दुसरे विजेतेपद आहे. सॅमसोनोव्हाने या सामन्यात 10 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. आता ती अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे.









