‘लव्ह टुडे’च्या रिमेकचे अद्वैत चंदन करणार दिग्दर्शन
आमिर खानचा पुत्र जुनैद आणि श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. हा नवा चित्रपट तमिळ ब्लॉकबस्टर चित्रपट ‘लव्ह टुडे’चा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहेत. चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू केले जाणार आहे. चित्रपटात जुनैद अणि खुशी हे तरुण जोडप्याच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. लव्ह टुडे या चित्रपटात प्रदीप रंगनाथथ आणि इवाना यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तर सत्यराज, योगी बाबू आणि राधिका सरतकुमार हे कलाकार देखील चित्रपटात दिसून आले होते. याच्या हिंदी रिमेकसाठी उर्वरित कलाकारांची नावे अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत. हा चित्रपट जुनैद आणि खुशी या दोघांचाही दुसरा चित्रपट असेल. दोघेही यापूर्वीच स्वत:च्या पदार्पणातील चित्रपटावर काम करत आहेत. जुनैद एकीकडे यशराज बॅनरचा चित्रपट ‘महाराज’मध्ये काम करत आहे. तर खुशी ही जोया अख्तरचा चित्रपट ‘द आर्चीज’मधून पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरुख खानची मुलगी सुहाना, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील आहेत.









