किणये : हलगा गावातील जागृत कलमेश्वर यात्रेला सोमवार दि. 10 रोजीपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा दोन दिवस चालणार असून देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी चारनंतर आंबिल गाडय़ांच्या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर होणार आहे. मंगळवार दि. 11 रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी कलमेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर इंगळ्यांसाठी लागणारी लाकडे गाडय़ांमधून मंदिरासमोर आणण्यात येणार आहेत. सायंकाळी 6 वाजता मंदिराजवळ इंगळय़ांचा कार्यक्रम होणार आहे. यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक अशी फुलहारांची सजावट करण्यात आली असून विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. या यात्रेचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
आज पोवाडय़ाचा कार्यक्रम

कलमेश्वर यात्रेनिमित्त बसवाण गल्ली, हलगा येथे सोमवार दि. 10 रोजी रात्री 8 वाजता शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांचा सह्याद्रीचा सिंह गर्जतो हा पोवाडय़ाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सर्वांनी या पोवाडय़ाचा लाभ घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.









