उलझ चित्रपटात साकारणार मुख्य भूमिका
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला आणखी एक मोठा चित्रपट मिळाला आहे. जान्हवी आता एका स्पाय थ्रिलर चित्रपटात दिसून येणार असून यातील तिची भूमिका अत्यंत वेगळी असणार आहे. जान्हवी कपूर आता ‘राजी’ आणि ‘बधाई हो’ यासारख्या चित्रपटांच्या निर्मात्याचा आगामी चित्रपट ‘उलझ’मध्ये दिसून येणार आहे. इंटरनॅशनल थ्रिलर चित्रपट ‘उलझ’मध्ये जान्हवी मुख्य भूमिकेत असेल. जान्हवीने या चित्रपटाची माहिती इन्स्टाग्रामवर दिली आहे.

अभिनेत्रीने चित्रपटातील अन्य कलाकारांसोबतचे छायाचित्र शेअर केले आहे. अभिनेत्रीचा फर्स्ट लुक पाहून चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. जान्हवीसोबत या चित्रपटात गुलशन देवैया, रोशन मॅथ्यू, राजेश तैलंग, मेयांग चांग, सचिन खेडेकर, राजेंद्र गुप्ता आणि जितेंद्र जोशी हे कलाकार दिसून येतील.
उलझ चित्रपटात आयएफएस अधिकाऱ्याची कहाणी दर्शविली जाणार आहे. संबंधित अधिकारी देशभक्तांच्या कुटुंबीयांचा असल्याची पार्श्वभूमी यात आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण चालू महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुधांशु सरिया करणार आहेत. चित्रपटाची कहाणी परवेझ शेख आणि सरिया यांनी लिहिली आहे. तर संवादलेखन अतिका चौहान यांनी केले आहे.









