वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 30 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय स्वरुपात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच आशिया चषकाचे वेळापत्रक जारी केले होते. आता सर्व सामन्यांच्या वेळाही समोर आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी तीन वाजल्यापासून खेळवले जाणार असल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले.
आशिया चषक स्पर्धेत एकूण 6 संघ भाग घेतील. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ आहेत. तसेच ब गटात बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका संघ आहेत. स्पर्धा दोन टप्प्यात खेळली जाईल, ज्यात साखळी फेरी आणि सुपर 4 फेरी असेल. दोन देश यजमानपद भूषवणाऱ्या या स्पर्धेतील 4 सामने पाकिस्तान आणि 9 सामने श्रीलंकेत खेळले जातील. पाकिस्तानमध्ये लाहोर आणि मुलतान शहरांमध्ये सामने होतील. तसेच, श्रीलंकेत 9 सामने कँडी आणि कोलंबो येथे खेळवले जातील. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तानच्या लाहोर येथे आणि अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी श्रीलंकेच्या कोलंबो येथे खेळला जाईल. यादरम्यान पाकिस्तान संघ साखळी फेरीत फक्त एकच सामना घरच्या मैदानावर खेळेल. तसेच, स्पर्धेत 2 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे.
दरम्यान, 31 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय चाहत्यांसाठी आशिया चषकाचे लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहाता येईल. याशिवाय स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह सामने पाहता येणार असून हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरु होतील.









