कुठल्याही मोठ्या हॉटेलमध्ये वेटिंगसाठी भली मोठी रांग असते. अशावेळी लोक आधीच बुकिंग करतात, जेणेकरून अधिकवेळ थांबावे लागू नये. काही हॉटेल्स त्यांच्या जेवणासाठी प्रसिद्ध असतात, तर काही वेगवेगळ्या मेन्यूंमुळे प्रसिद्ध असतात. काही हॉटेल्समधील वातावरण, अँबियन्स इतका छान असतो की, लोक ते पाहण्यासाठी जातात. काहीवेळा हॉटेल्सच्या आकर्षक ऑफरमुळेही लोक गर्दी करतात. खवय्ये आवडीच्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी कितीही वेळ वेटिंगमध्ये थांबण्यास तयार असतात. मात्र तुम्हाला कुणी एखाद्या हॉटेलमध्ये 4 वर्षे वेटिंगला थांबण्यास सांगितले तर काय कराल?

भारतातील रेस्टॉरंटमध्ये वेटिंग हे फार तर 40 ते 50 मिनिटांचे असू शकते. मात्र ब्रिटनच्या सेंट्रल ब्रिस्टलमध्ये असलेल्या ‘द बँक टॅव्हर्न पब’मध्ये टेबल मिळविण्यासाठी तुम्हाला तब्बल 4 वर्षे वाट पहावी लागणार आहे. या ठिकाणी टेबल बुक करणे ही प्रचंड कठीण गोष्ट आहे. म्हणूनच या पबला टेबल बुक करण्यासाठी जगातील सर्वात कठीण रेस्टॉरंटचा मान मिळाला आहे.
ब्रिटनमधील या हॉटेलमध्ये रविवारी पार्टी करण्यासाठी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागते. याचा अर्थ आज किंवा उद्या जर कुणी बुकिंग केले तर त्याचा नंबर 2027 मध्ये येईल. कोरोना, लॉकडाउनमुळे या हॉटेलचा प्रतीक्षा कालावधी 4 वर्षांपेक्षा अधिक झाला आहे.
हा प्रसिद्ध पब येथे येणाऱ्या ग्राहकांना दर रविवारी स्वत:चा खास संडे रोस्ट सर्व्ह करतो आणि लोकांना तो इतका आवडतो की संडेसाठी टेबल बुक करण्याची मागणी येथे सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे या पबला त्याच्या संडे रोस्टसाठी पुरस्कारही मिळाला आहे. ही पब डिश अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असून लोक ती खाण्यासाठी कित्येक वर्षांची वाट पाहण्यास तयार आहेत. हे हॉटेल 18 व्या शतकापासून या ठिकाणी सुरू आहे. अनेक दंगली, दोन महायुद्धे, बदललेले राजकारण, आपत्ती अशा अनेक घटनांचा साक्षीदार हे हॉटेल आहे.









