विनोद दो•ण्णावर : आचार्य प. पू. श्री विद्यासागर स्वामीजींना विनयांजली अर्पण : शहरात मौन फेरी
बेळगाव : भारतीय संस्कृती त्यागाला महत्त्व देते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आचार्य परमपूज्य विद्यासागर स्वामी होय. चरित्रातून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आणि हिंसेने नव्हे तर परस्पर सामंजस्यानेच कोणत्याही समस्येवर मात करता येते, असा उपदेश केला. त्याचे आचरण आपण केले पाहिजे, असे विचार भरतेश ट्रस्टचे पदाधिकारी विनोद दो•ण्णावर यांनी व्यक्त केले. दिगंबर जैन मुनी परंपरेचे आचार्य प. पू. श्री विद्यासागर स्वामीजी यांना नुकतीच सल्लेखना व्रतानंतर देवाज्ञा झाली. त्यांना विनयांजली अर्पण करण्यासाठी रुपाली कन्वेंशन हॉलमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये दो•ण्णावर बोलत होते. व्यासपीठावर अॅड. रविराज पाटील, सुमन पत्रावळी, श्री आदीसागर व श्री निर्दोषसागर महाराज उपस्थित होते. प्रारंभी कोरे गल्ली येथील जैन बस्तीपासून रुपाली कन्वेंशन हॉलपर्यंत मौन फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये बहुसंख्य साधक-भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर रुपाली कन्वेंशन हॉल येथे विद्यासागर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन मिनिटे मौन धारण करून त्यांना विनयांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सुमन पत्रावळी यांनी श्री विद्यासागर मुनी यांनी मीठ, साखर, फळे, भाज्या यांचा सर्वस्वी त्याग केला होता. एका अर्थाने सर्व भौतिक सुखाचा त्याग करून आपल्या वर्तनातून त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला. त्यागातून जीवनाची महत्ती समजावून दिली. त्यांनी 300 मुलींना दीक्षा दिली. त्यामध्ये 130 मुनी आणि अन्य माताजींचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे 300 जणांना आजीवन ब्रह्मचर्याची दीक्षा दिली. विद्यासागर मुनी यांनी जीवनभर अहिंसेचा संदेश दिला, असे त्या म्हणाल्या. यावेळी अॅड. रविराज पाटील तसेच श्री आदिसागर व श्री निर्दोषसागर या स्वामींनीही आपले विचार व्यक्त केले. मृत्यू अटळ आहे, पण गेलेल्या व्यक्तीने समाजासाठी जे कार्य केले आहे, त्याचे चिरंतन स्मरण करणे आपले कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. सभेला जैन समाजातील महिला आणि पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.









