केएलईत मोफत शस्त्रक्रिया : डॉ. कोरे यांचा पुढाकार
बेळगाव : जन्मत:च हातांच्या बोटांचे असलेले व्यंग शस्त्रक्रियेच्या माध्यमातून दूर करण्यात आले आहे. केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्रातील प्लास्टिक सर्जरी विभागातील डॉक्टरांनी मोफत शस्त्रक्रिया करून बालिकेला दिलासा दिला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या चिकोडी तालुक्यातील एका गावातील कुटुंबीयांना केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी मोफत शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा करून दिलासाच दिला आहे. एका बालिकेची जन्मत:च हातापायांची बोटे जुळलेली होती. वैद्यकीय भाषेत ‘सिंडॅक्टिली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यंगामुळे बालिका त्रस्त होती. त्या बालिकेच्या कुटुंबीयांनाही चिंता होती. त्यांनी प्लास्टिक सर्जरी विभागाचा सल्ला घेतला. शासकीय योजनेतून शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी या कुटुंबीयांनी केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची मागणी केली. त्यावेळी मोफत शस्त्रक्रिया करून प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉ. राजेश पवार व त्यांच्या पथकाने या बालिकेचे व्यंग दूर केले आहे. शस्त्रक्रियेनंतर त्या बालिकेची बोटे सुटी झाली आहेत. सध्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून दोन महिन्यांनंतर डाव्या हातावरही शस्त्रक्रिया करून जुळलेली बोटे सुटी करण्यात येणार आहेत. त्यानंतर तिच्या पायांवरही शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मोफत शस्त्रक्रिया करून बालिकेला दिलासा देणारे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, प्लास्टिक सर्जन डॉ. राजेश पवार यांना त्या बालिकेच्या कुटुंबीयांनी धन्यवाद दिले आहेत.









