नादुरुस्त बसचा अपघात, जुन्या बसेस सेवेत, दुरुस्तीकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
परिवहनकडून विविध मार्गांवर जुन्या आणि नादुरूस्त बस सोडल्या जात असल्याने अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी बिजगर्णी गावाजवळ भरधाव बसचा टायर निखळून पडल्याने अपघात घडला. केवळ सुदैवाने अनर्थ टळला असला तरी नादुरूस्त बस प्रवासासाठी पाठविण्याचा परिवहनचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. शिवाय नादुरूस्त बसचे अपघात यामुळे बसचा प्रवास करणे धोकादायक ठरत आहे, अशा प्रतिक्रिया प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
मागील दोन वर्षात कोरोनामुळे परिवहनला प्रचंड फटका बसला आहे. दरम्यान परिवहनला नवीन बस खरेदी करणे शक्य नाही, दरम्यान राज्य सरकारकडून नवीन बस खरेदीसाठी अनुदान मिळाले नाही. त्यामुळे ताफ्यात उपलब्ध असलेल्या बसेसच्या माध्यमातून बससेवा पुरविली जात आहे. या जुन्या बसच्या समस्या वाढल्या आहेत. दरम्यान बीएमटीसीकडून खरेदी केलेल्या बस अद्याप परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या नाहीत. त्यामुळे आहे त्या बसेसवर परिवहनला बससेवा पुरवावी लागत आहे. परिवहनच्या ताफ्यात बसची संख्या कमी असल्याने जुन्या बसचा वापर वाढला आहे. या जुन्या बस रस्त्यावर नादुरूस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय अपघात देखील घडत आहे. परिणामी प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.
कोरोनानंतर विविध मार्गावर बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः ग्रामीण आणि जवळच्या पल्ल्यासाठी जुन्या आणि नादुरुस्त बस पाठविल्या जात आहेत. दरम्यान बस रस्त्यात बंद पडणे, धूर सोडणे, बेक फेल होणे आदी प्रकार वाढले आहेत. बसगाडय़ाची व्यवस्थित दुरुस्ती करण्याऐवजी केवळ नाममात्र दुरुस्ती केली जात आहे. त्यामुळे नादुरुस्त बसच्या तक्रारी वाढत आहेत. अशा बिघाड झालेल्या बस सोडल्या जात असल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळय़ात बस नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे प्रवाशांना इतर वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. ग्रामीण भागात तर बसेस बंद पडणे व अपघात घडण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे जुन्या बसेस थांबवून प्रवाशांसाठी नवीन बसेस पाठवाव्यात, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट बसस्थानकात मूलभूत सुविधांची वानवा

आसनांचाही तुटवडा, प्रवाशांची गैरसोय, परिवहनचेही दुर्लक्ष
स्मार्ट बसस्थानकात आसनाअभावी प्रवाशांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. या ठिकाणी आसने कमी पडत असल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकात तातडीने आसने उपलब्ध करावीत, अशी मागणी होत आहे.
सतत प्रवाशांनी गजबजणाऱया बसस्थानकात प्रवाशांची संख्या वाढत आहे. शिवाय स्मार्ट बसस्थानकदेखील प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी आसनांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर थांबावे लागत आहे. त्यामुळे ऊन, पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. स्मार्ट बसस्थानकात विविध सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात बसस्थानकात आसनाअभावी प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. दरम्यान पावसामुळे बसथांब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे. मात्र आसने कमी पडत असल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागत आहे.
स्मार्ट सिटी योजनेतून बसस्थानकाचा विकास साधला जात आहे. बसस्थानकाचे अद्याप बरेच काम शिल्लक आहे. मात्र बससेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय आणि आसनांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषतः महिला आणि लहान बालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तातडीने बसस्थानकात आसने उपलब्ध करावीत, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.









