वृत्तसंस्था/ डब्लिन
न्यूझीलंड संघाविरुद्ध मायदेशी होणाऱया तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आयर्लंडचा 14 जणांचा संघ मंगळवारी जाहीर करण्यात आला. टी-20 मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी आयर्लंड संघाचे नेतृत्व अँड्रय़ू बॅलबिर्नीकडे सोपविण्यात आले आहे.
अलीकडेच आयर्लंड आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळविली गेली. या मालिकेत भारताने आयर्लंडचा 2-0 असा पराभव केला. या मालिकेत खेळलेल्या आयर्लंड संघामध्ये आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारताविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने आयर्लंडला निर्णायक विजयासाठी 226 धावांचे आव्हान दिले होते. तथापि आयर्लंडने दमदार फलंदाजी केली पण त्यांना विजयासाठी 4 धावांची कमतरता भासली.
न्यूझीलंडविरुद्ध खेळविण्यात येणाऱया मालिकेसाठी आयर्लंड संघामध्ये नवोदित कोनोर ओलफर्ट आणि स्टिफन डुहेनी यांनी आपले स्थान राखले आहे. ओलफर्टने आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण भारताविरुद्धच्या मालिकेत केले होते. गेल्या मालिकेत आयर्लंड संघातील खेळाडूंनी भारताविरुद्ध समाधानकारक कामगिरी केल्याने निवड समिती प्रमुखांनी आगामी मालिकेसाठी संघात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला.
आयर्लंड टी-20 संघ- अँड्रय़ु बॅलबिर्नी (कर्णधार), मार्क ऍडेर, कर्टीस कॅम्फर, गॅरेथ डिलेनी, जॉर्ज डॉक्रेल, स्टिफेन डुहेनी, जोश लिटल, अँड्रय़ु मॅकब्रिने, बॅरी मॅक्रेथी, ओलफर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, टकेर आणि क्रेग यंग.
आयर्लंड वनडे संघ- अँड्रय़ु बॅलबिर्नी (कर्णधार), मार्क ऍडेर, कर्टीस कॅम्फर, गॅरेथ डिलेनी, जॉर्ज डॉक्रेल, स्टिफेन डुहेनी, ग्रॅहॅम हय़ुम, जोश लिटल, अँड्रय़ु मॅकब्रिने, सिमी सिंग, ओलफर्ट, पॉल स्टर्लिंग, हॅरी टेक्टर, टकेर आणि क्रेग यंग.









