वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील हाँगझोऊ येथे 22 ते 28 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या चौथ्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे 446 जणांचे पथक सहभागी होणार आहे. या पथकामध्ये 303 अॅथलिट्सचा समावेश आहे.
या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालयाने एकूण 303 अॅथलिट्सना सहभागी होण्याची मंजुरी दिली असून त्यामध्ये 191 पुरुष तर 112 महिलांचा समावेश आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू 17 विविध क्रीडा प्रकारात आपला सहभाग दर्शविणार आहेत. जकार्ता येथे चार वर्षांपूर्वी झालेल्या 18 व्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताच्या 190 क्रीडापटूंनी आपला सहभाग दर्शविला होता आणि त्यांनी 15 सुवर्णांसह एकूण 72 पदकांची कमाई केली होती.









