2-0 गोलफरकाने मात, आज जर्मनीविरुद्ध लढत
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेतील परतीच्या सामन्यात भारताच्या पुरुष संघाने शानदार प्रदर्शन करीत स्पेनवर 2-0 असा विजय मिळविला. पहिल्या टप्यातील सामन्यात स्पेनने भारताला 3-1 असे हरविले होते.
परतीच्या सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे वेगळा दिसला. त्यांनीच या सामन्यावर बराच काळ वर्चस्व गाजवत दोन मैदानी गोल नोंदवले. मनदीप सिंगने 32 व्या मिनिटाला तर दिलप्रीत सिंगने 39 व्या मिनिटाला हे गोल नोंदवत पूर्ण तीन गुण वसूल केले. मंगळवारी भारताचा पुढील सामना जर्मनीशी होणार आहे.
भारताने बॉल पझेशनच्या बाबतीत वर्चस्व राखले आणि पहिल्या दोन सत्रात त्यांनी अनेक संधी निर्माण केल्या. मात्र त्यांना त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. पाचव्या मिनिटाला मनदीपला गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती. पण स्पेनचा गोलरक्षक राफेल रेव्हिला अप्रतिम बचाव करीत त्याचा प्रयत्न फोल ठरविला. पहिले सत्र संपण्यास काही सेकंद असताना भारताने लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळविले. पण जुगराज सिंगला त्यावर गोल करता आले नाहीत. भारताचा गोलरक्षक कृशन बहादुर पाठकनेही 14 व्या मिनिटाला अप्रतिम बचाव करीत स्पेनचा प्रयत्न वाया घालविला. पहिल्या दोन सत्रात भारताने गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना स्पेनचा भक्कम बचाव भेदण्यात यश आले नाही.
मध्यंतरानंतर दुसऱ्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण रेव्हिलाने दोनदा प्रयत्न करीत जुगराजचा प्रयत्न वाया घालविला. मात्र फ्री हिट मिळाला आणि दिलप्रीतने दिलेला पास मनदीपने डिफ्लेक्ट करीत भारताचा पहिला गोल नोंदवला. सात मिनिटानंतर दिलप्रीतने भारतातर्फे खेळताना 32 वा गोल नोंदवत भारताची आघाडी 2-0 अशी केली. मनदीप व गुर्जंत सिंग यांनी यासाठी चाल रचली होती. 43 व्या मिनिटाला स्पेनने पेनल्टी कॉर्नर मिळविला. त्यांचा ड्रॅगफ्लिकर पेपे कनिलच्या सदोष नेमबाजीमुळे ही संधी वाया गेली. दोन गोलनी पिछाडीवर पडल्यानंतर अखेरच्या टप्प्यात त्यांनी आक्रमण तेज केले. पण भारतीय बचावफळीने भक्कम बचाव करीत त्यांना यश मिळू दिले नाही. कर्णधार हरमनप्रीत सिंगला या सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.









