वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उझ्बेकिस्तानमधील ताश्कंद येथे 30 एप्रिल ते 14 मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेच्या पुरुषांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारतीय मुष्टियुद्ध संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये शिवा थापा तसेच दीपक भोरिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
2015 साली कतारमध्ये झालेल्या पुरुषांच्या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताच्या शिवा थापाने कांस्यपदक मिळविले होते. आता तो ताश्कंद येथे होणाऱ्या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत 63.5 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करताना आणखी एका पदकासाठी सज्ज झाला आहे. शिवा थापाने सहावेळा आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक मिळवले आहे. तसेच 2019 च्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारा दीपक भोरियाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दीपक भोरिया 51 किलो फ्लायवेट वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. 2021 साली झालेल्या स्ट्रेंजा स्मृती आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत दीपक भोरियाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता तसेच 2019 साली विश्व चॅम्पियन म्हणून ओळखला जाणारा उझ्बेकचा झोरिओव्हचा पराभव केला होता. ताश्कंदमध्ये होणाऱ्या या आगामी स्पर्धेत भारतीय स्पर्धक निश्चितच दर्जेदार कामगिरी करतील, असा विश्वास अखिल भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी व्यक्त केला आहे.
ताश्कंदमध्ये होणाऱ्या या विश्व मुष्टियुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत 7 अव्वल मुष्टियोद्धे सहभागी होत आहेत. फ्रान्सचा विद्यमान विश्वविजेता सोफेनी ओमिहा, जपानचा टोमोया सुबोई आणि ओकाझेवा, अझरबैजानचा अल्फोन्सो, कझाकस्तानचा बिबोसिनोव्ह, क्युबाचे हेर्नांजे मार्टिनेझ आणि ज्युलिओ ला क्रूझ यांचा समावेश आहे. ताश्कंदमध्ये होणाऱ्या या विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत आतापर्यंत 104 देशांच्या सुमारे 640 स्पर्धकांनी अधिकृत नोंद केली आहे. भारतीय संघामध्ये आणखी एक अनुभवी मुष्टियोद्धा मोहम्मद हुसामुद्दीन याचा समावेश आहे. तो 57 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधित्व करेल. 48 किलो गटात गोविंद सहानी, 60 किलो गटात वरिंदर सिंग, 67 किलो गटात आकाश सांगवान, 71 किलो गटात निशांत देव, 75 किलो गटात सुमित कुंडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राजस्थानचा हर्ष चौधरी पहिल्यांदाच विश्व मुष्टियुद्ध स्पर्धेत आपले पदार्पण करीत असून तो 86 किलो वजन गटात खेळत आहे. नवीनकुमार आणि नरेंद्र बेरवाल हे अनुक्रमे 92 आणि 92 किलोवरील गटात भारताचे प्रतिनिधित्व करतील. ताश्कंदमधील होणाऱ्या या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्यांसाठी एकूण 20 लाख अमेरिकन डॉलर्सची रक्कम तसेच रौप्यपदक विजेत्यांसाठी 10 लाख डॉलर्सची रक्कम त्याचप्रमाणे कांस्यपदक विजेत्यांसाठी प्रत्येकी 50 हजार अमेरिकन डॉलर्स बक्षिसाची रक्कम दिली जाणार आहे. 17 एप्रिलला भारतीय संघ ताश्कंदला रवाना होईल. सदर स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धेच्या धर्तीवर सात विविध वजन गटांमध्ये घेतली जाणार आहे.
भारतीय मुष्टियुद्ध संघ- गोविंद सहानी, दीपक भोरिया, सचिन सिवाच, मोहम्मद हुसामुद्दिन, वरिंदर सिंग, शिवा थापा, आकाश सांगवान, निशांत देव, सुमित कुंडू, आशिष चौधरी, हर्ष चौधरी, नवीनकुमार आणि नरेंद्र बेरवाल.









