भाजीपाला, फळे, लिंबूंना मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजीपाल्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे टोमॅटो, बटाटा, वांगी, कांदापात, पालक, लालभाजी, कोथिंबीर, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांचे दर घसरले आहेत. वाढत्या उष्म्यामुळे पालेभाज्यांना पसंती दिली जाऊ लागली आहे. त्याचबरोबर किरकोळ बाजारात हापूस दाखल होऊ लागला आहे. काही भाज्या वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसत आहे. गाजर, काकडी, दूधीभोपळा, लिंबू व फळांनादेखील मागणी वाढू लागली आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात काकडी 50 रु. किलो, गाजर 50रु. किलो, शेवग्याच्या शेंगा 10 रुपये एक, फ्लॉवर 20 रुपये, ढबू 60 रु. किलो, गवार 100 रु. किलो, बिनीस 80 रु. किलो, ओलिमिरची 60रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, वांगी 20रु. किलो, कारली 60रु. किलो, भेंडी 80रु. किलो, बटाटा 30 रु. किलो, दोडकी 60रु. किलो, कोबी 20 रुपयाला एक, मेथी 20 रुपयाला दोन पेंड्या, कांदा पात 10 रुपयाला दोन, 20 रुपयाला पाच पेंड्या, पालक 10 रुपयाला दोन, 20 रुपयाला चार पेंड्या, लाल भाजी 10 रुपयाला एक व 20 रुपयाला तीन पेंड्या, कोंथिबीर 10 रुपयाला एक पेंडी, लिंबू 10 रुपयाला दोन असा दर आहे.
पामतेल, सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ
सनफ्लॉवर तेलाचे दर स्थिर आहेत. मात्र पामतेल आणि सोयाबिनच्या तेल दरात किलोमागे 5 रुपयांनी वाढ झाली आहे. मागील काही दिवसात खाद्य तेलाचे दर कमी होऊन स्थिर झाले होते. मात्र सोयाबीन आणि पामतेलाच्या दरात वाढ झाली आहे. सनफ्लॉवर 136 रु. किलो, सोयाबीन 120रु. किलो असा तेलाचा दर आहे.
लिंबू खातोय भाव
वाढत्या उष्म्यामुळे लिंबुना मागणी वाढू लागली आहे. आवक समाधानकारक असली तरी 5 ते 7 रुपये एक याप्रमाणे लिंबूची विक्री सुरू आहे. लिंबू सरबत, लिंबू सोडा मागणी वाढू लागल्याने लिंबूने भाव खाल्ला आहे.









